सांगली : जय शिवराय घोषणा घेउन तरूणांना संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने निश्‍चित केले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत  पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहर, तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकार्‍यांचा मेळावा आज सांगलीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास पश्‍चिम महाराष्ट्र प्रभारी हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, लोकांचे प्रश्‍न घेउन  यापुढील काळात उभे राहिले पाहिजे. तेच तेच चेहरे लोकासमोर देण्याऐवजी नवीन चेहरे देउन तरूणांना संधी देण्याचे पक्षाचे यापुढे धोरण राहणार आहे. महायुतीने निवडणुकीपुर्वी ओबीसीमधील लहान लहान घटकासाठी महामंडळाची घोषणा केली, मात्र, अर्थसंकल्पात त्यासाठी  कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.

समस्त ओबीसींचे प्रश्‍न घेउन आपणास संघर्ष करावा लागणार आहे. लाडकी बहिण योजनेतून अनेक बहिणींना वगळण्यात आले. एखादी महिलेकडून ग्राहक न्यायालयात फसवणुक करून मते  घेतली अशी जर तक्रार झाली तर सरकार बरखास्त करण्यास सांगितले जाईल असेही ते म्हणाले. शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह दुर्लक्षित घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलनाची तयारी ठेवावी.

विधानसभा निवडणुकीत बटेगे ते कटेंगेचा नारा देण्यात आला.यामुळे  काही तरूण वळले. पण सोळाव्या शतकातील परिस्थिती आता उरलेली नाही. शेतीमध्ये कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून अधिक उत्पादन कसे काढता येइ्रल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अल्पसंख्याक समाजात  दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, घटनेने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करण्याचे काम आता आपणास करावे लागणार आहे असेही आ. पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्याने आम्ही भ्रमात राहिलो. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री याची चर्चा करत राहिलो.  विरोधक मात्र, लोकसभेच्या पराभवानंतर तळागाळापर्यंत पोहचून काम करत राहिले. लाडक्या बहिणींची मते घेतली. आता यापुढे आपण गाफील न राहता सामान्यांचे प्रश्‍न घेउन संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. मागणी, आंदोलन आणि अन्यायाविरूध्द संघर्ष या तीन बाबींवर कार्यकर्त्यांनी लक्ष केेंद्रित करावे.

माजी मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले, यापुढे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय शिवराय हाच नारा वापरावा. एकीकडे महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम करण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरूणांना भावनिक मुद्द्यावर दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची जाणीव करून द्यायला हवी. आगामी काळात तालुकास्तरावर मेळावे घेउन सक्षम कार्यकर्त्यांकडे पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येईल. यावेळी आ.रोहित पाटील, आ. अरूण लाड, माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक , जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, संजय बजाज, बाबासाहेब मुळीक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.