पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले असता त्यांनी नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांकरिता सभा घेतली होती. त्यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती. त्यानंतर घोषणा देणारा तरूण हा शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला होता. या घोषणाबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना खुद्द शरद पवार यांनीही या घोषणाबाजीचे समर्थन करत आपली बाजू स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांना पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी देणार्‍या तरुणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, हे खरं आहे तो तरुण मी नाशिकला असताना मला भेटला होता. मी शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता असं त्याने विधान केलं, पण त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मोदींच्या सभेत घोषणा देणारा जर कार्यकर्ता माझा असता तर त्याचा मला अभिमान असता की ज्याने हा मुद्दा मांडला, असे देखील पवार स्पष्टपणे म्हणाले. पुढे याचसंदर्भात बोलताना म्हणाले की, दुसर्‍या दिवशी तो तरुण मला सुदैवाने भेटला तेव्हा मी त्याला विचारले तू हे कसं केलं? तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला का? त्यावेळी त्याने सांगितले की, मी इतक्या रुपयांची कांद्यासाठी गुंतवणूक केली होती पण त्यातून मला २० टक्क्यांचाही पण परतावा मिळाला नाही. ज्या बॅंकेकडून मी कर्ज घेतले होते ती मला सोडणार आहे का? आणि मोदी सभेत फक्त राम मंदिर वैगरे मुद्दे एकदा नाही, तर दहा वेळा बोलत होते मग मला सहन न झाल्याने मी उठून घोषणाबाजी केल्याचे त्या तरुणाने मला सांगितल्याचे पवार म्हणाले. पवारांनी त्या तरुणाने केलेल्या घोषणाबाजीचं समर्थन केलं आणि म्हणाले, त्या तरुणाने काही चुकीचं केल्याचं मला नाही वाटतं. तुमच्या सभेत जर एखादा तरुण उभा राहतो आणि प्रश्न विचारतो तर तुम्हाला इतकी का अस्वस्थता वाटायला हवी? असे प्रकार आमच्या किंवा सगळ्यांच्याच सभेत होत असतात. पण सध्याच्या घडीला भाजपाच्या आणि खासकरुन मोदींच्या सभेत असे काही प्रकार घडले की, त्यानंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली जात असल्याची टीका शरद पवारांनी यावेळी केली.

मोदींच्या नाशिकच्या सभेत त्या दिवशी नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते तितक्यात समोरुन घोषणा आली, “कांद्यावर बोला.. कांद्यावर बोला.” या शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या. त्यानंतर मोदी एक क्षण थांबले, समोरुन मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. भारतमाता की जय या घोषणाही दिल्या. तसंच पुढे त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं.

हेही वाचा – Video: “…तर मला त्याच दिवशी राजीनामा द्यावा लागला असता”, शरद पवारांनी सांगितल्या २५ वर्षांपूर्वीच्या घडामोडी!

घोषणाबाजी करण्यास पक्षाने सांगितले का? याबाबत त्या तरुणाचे स्पष्टीकरण

मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणार्‍या तरुणाचे नाव किरण सानप असून त्याने आपण घोषणाबाजी का केली याबाबात स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत तो म्हणाला की, मी शरद पवार यांना माननारा कार्यकर्ता आहे. पण ही घोषणाबाजी करण्यासाठी कुणीही मला उद्युक्त केलेले नव्हते किंवा याबाबत मला कुणीही काही सांगितलेले नाही. मी एक सामान्य शेतकरी आहे. त्या अनुषंगाने मी स्वयंप्रेरणेने मोदींना कांद्यावर बोलण्यासाठी आग्रह केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar replies on activist shouted slogan on onion during pm modi speech in nashik
Show comments