भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं. एनडीएला मिळून २९२ जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त १७ जागा मिळवता आल्या. तर महाविकास आघाडीने ३० जागा मिळवल्या. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आणि महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना सूचक भाष्य केलं. “लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं”, असं राज ठाकरेंनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या या टीकेला मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं. यावर शरद पवारांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “मला माहिती नाही. मात्र, आमचे पाय जमिनीवर आहेत”, असा टोला शरद पवारांनी राज ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा : शरद पवार अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार? पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, यासह अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. याचवेळी बोलताना राज ठाकरे यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना सूचक भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, “हे राजकीय व्यासपीठ नाही. मात्र, उद्या कोणी येथून तिकडे जातील, पुन्हा तेथून दुसरीकडे जातील. आपल्याला आता काहीच माहित नाही. साधारण आपण हे वर्षभर सहन करू. नेमकं काय होतंय ते वर्षभरानंतर पाहू. आता जे काही सुरु आहे, ते लोकसभेचा ज्या प्रकारे निकाल लागला, त्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणून ठेवलेलं आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.