उमेदवार निश्चितीला विलंब होण्याची शक्यता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू असली तरी शिवसेनेतील निर्णयांवरच इतरांच्या निर्णयप्रक्रियेला वेग येण्याचे संकेत आहेत. त्यातही उमेदवार निश्चितीनंतर होणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य बंडखोरीकडे राष्ट्रवादीचे लक्ष असून त्याचाच अनपेक्षित राजकीय फायदा उचलण्याचा राष्ट्रवादीचा मानस आता उघड होत आहेत. त्यामुळे शिवसेनेसह सर्वाच्याच उमेदवार याद्यांना विलंब होण्याची शक्यता आहे.

मुळात दापोलीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी अशी दुहेरी लढत होत आलेली आहे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजपने युती नाकारत सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नगरपंचायत निवडणुकीत आघाडी करत स्वत:ची ताकद दाखवली. मात्र या निवडणुकीनंतर काँग्रेसने आघाडीतून बाजूला होत सत्तेसाठी शिवसेनेला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी दुखावली गेल्याने आता त्यांच्यात पुन्हा मनोमीलनाची शक्यता धूसर झाली आहे. मात्र निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना राष्ट्रवादीने मात्र राजकीय हालचालींवर मर्यादा आणल्याचे दिसत आहे. अर्थात त्यांचे सर्व लक्ष शिवसेनेतील हालचालींकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने शिवसेनेतही गेल्या काही दिवसांत अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र दळवी यांनी योग्य दबावतंत्र वापरत रामदास कदम आणि योगेश कदम यांचे दापोली काबीज करण्याचे आक्रमक मिशन फोल ठरवले. कदम यांची मदार दळवी विरोधावर आणि विरोधी गटावर उभारलेली असल्याने दळवी समर्थकांनी तो विरोध यशस्वीपणे परतावून लावला. साहजिकच मातोश्रीवर दळवी यांचे स्थान अबाधित राहण्याचे आश्वासन मिळाल्याने आगामी निवडणुकीतील उमेदवारनिश्चितीवर त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व राहण्याचे संकेत मिळाले. अशा गोंधळातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी पार पडल्या. या प्रक्रियेत दळवी यांना कदम समर्थकांना दूर ठेवण्यात यश आले असले तरी स्वत: योगेश कदम यांनी मुलाखतींसाठी उपस्थित राहत समर्थकांना सुखद दिलासा दिला. मात्र एकूणच उमेदवार निश्चितीमध्ये कदम समर्थकांना डावलले जाण्याचे संकेत असल्याने आता या नाराज नेत्यांकडेच राष्ट्रवादीचे लक्ष राहणार आहे. भाजपनेही शिवसेनेच्याच उमेदवार निश्चितीकडे लक्ष लावलेले असून त्यांची यादीही शिवसेनेनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या पाश्र्वभूमीवर विरोधकांना गाफील ठेवण्याच्या भूमिकेतून शिवसेनाश्रेष्ठींकडून उमेदवार यादीची घोषणा पुढील महिन्यातच होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Story img Loader