केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
काही दिवसांपूर्वी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना “घरी जा आणि स्वयंपाक करा असं म्हणाले होते”. त्याला अनुसरून हा टोला लगावण्यात आला आहे. सुप्रिया सुळेंना दिलेल्या या सल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.


चंद्रकांत पाटलांकडून परीक्षेत यश मिळवणाऱ्या मुलींचे अभिनंदन
‘UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय.’ असे ट्विट चंद्रकांत पाटलांनी केले आहे.


राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांवर टीका
युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे. ‘केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?’ असा सवाल राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर हँडलवरून विचारण्यात आला आहे.

Story img Loader