सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात मोठी कारवाई केलीय. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता भाजपाच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. असं असतानाच आता आता राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधालाय. भाजपाकडे महाविकासआघाडीतील नेत्यांना सूडाच्या राजकारणाअंतर्गत लक्ष्य केलं जात असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलंय.
नक्की वाचा >> ED ची राऊतांविरोधात कारवाई : निलेश राणे म्हणतात, “राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही…”
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाईसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडलीय.
“महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली असं ऐकलं.
हे काय चाललं आहे? हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे,” असं तापसे म्हणालेत. “२०१९ मध्ये राज्यात सरकार न बनवून शकलेली भाजपा सूडाच्या राजकारणाच्या माध्यमातून महाविकासचे आघाडी जे बलस्थान आहेत, शक्तीशाली नेते आहेत त्यांना टप्प्याटप्याने लक्ष्य करण्याचं काम करत आहे,” असा आरोप तापसेंनी केलाय.
“जे संजय राऊत महाविकास आघाडीबद्दल बोलत होते, भाजपाविरोधात बोलत होते, त्यांच्यावर ही कारवाई झाली त्यांचं राहतं घर जप्त करण्यात आलं.
अशापद्धतीचं सुडाचं राजकारण ईडीच्या माध्यमातून करण्यात आलं. कालच ईडी आणि मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीसंदर्भात संजय राऊतांनी तक्रार दिलेली. त्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी एसआयटीची चौकशी लावली. ही चौकशी लागली रे लागली की ईडीचे त्यांच्यावर कारवाई केली त्यांचं राहतं घर जप्त केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, हे महाविकास आघाडीला बदनाम करायचं. महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडाचं राजकारण करायचं अशापद्धतीने भारतीय जनाता पर्टी करत आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीकोनातून योग्य नाही,” असं तापसे म्हणालेत.