महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेखही राज यांनी आपल्या भाषणामध्ये केला. याच टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शरद पवारांचा हुनमान मंदिरामधील फोटो शेअर करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नक्की वाचा >> “…मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची”; ‘जंत पाटील’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जयंत पाटलांचं उत्तर
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
‘‘शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का,” असा सवाल राज यांनी केला़ “विदेशी व्यक्ती पंतप्रधान नको, या मुद्यावर शरद पवार हे १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र ते काँग्रेसबरोबर जाऊन कृषीमंत्री झाले. पवारांनी आतापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या,” असेही राज म्हणाले.
मुस्लीम मतांवरुनही टीका…
‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली़ त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीचा टोला…
राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी थेट शरद पवारांचा मंदिरामधील फोटो ट्विट करत उत्तर दिलंय. “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी आजपर्यंत जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा कैकपटींनी जास्त मंदीरांना सभामंडप देण्याचे व तीर्थस्थळांचा विकास करण्याचे काम पवार यांनी केले आहे,” असा टोला वरपे यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, “फरक एवढाच की श्रद्धेचा बाजार भरवून धर्माच्या नावाने पवार मतांचा जोगवा मागत नाहीत,” असंही वरपेंनी म्हटलंय.
राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना ५ एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याचाच संदर्भ देत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.