CM Eknath Shinde on MPSC Students: एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या खूप गाजतोय. विविध राजकीय पक्षांचे नेते या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील काल रात्री उशीरा विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर माध्यमांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री शिंदे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत असताना लोकसेवा आयोग बोलण्याची ऐवजी निवडणूक आयोगावर घसरले. त्यामुळे शिंदेंना नक्की काय म्हणायचे होते? असा प्रश्न निर्माण झाला. शिंदेच्या या अजब वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राष्ट्रवादीने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करुन खोचक टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “वहिनींनी कळत-नकळत…”, शिवसेना फुटण्याचे कारण सांगताना भरत गोगावले यांनी केला खळबळजनक आरोप

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

वृत्तावाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले, “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. २०२५ पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.”

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करुन मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. “यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…”, असे खोचक ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना मुख्यमंत्र्यांचा झालेला घोळ बरोबर कळला असून त्यांना काय म्हणायचे होते, ते मिटकरी यांनी सांगितले. “साहेबांनी #MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, असे चुकुन सांगितले असावे.”, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp social media take jibe on cm eknath shinde statement on mpsc student protest kvg