राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हा सध्या संपूर्ण राज्यातला चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्यासह नऊ जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या सगळ्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन पक्ष आपलाच आहे असंही म्हटलं आहे. तसंच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असून चिन्हाची मागणी केल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवारांचे ज्येष्ठ सहकारी चंद्रराव तावरे यांनी हे सगळं नाटक शरद पवारांनीच घडवलं आहे असा आरोप केला आहे.
हे पण वाचा “राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्हीच दावा सांगितला आहे, ३० जूनलाच..”; प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्वाचं वक्तव्य
काय म्हटलं आहे चंद्रराव तावरेंनी?
“मी ४० वर्षे शरद पवारांबरोबर राजकारणात होतो. मी निवडणुकीत त्यांचा प्रचारही केला आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे मला माहित आहे. त्यांच्यात कधीही फूट पडू शकत नाही. हे सगळे लोक एकच आहेत. हे सगळं दाखवण्यासाठी वरच्या लोकांना सांगण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कारण त्यांच्यावर ज्या काही कारवाया होणार आहेत त्या टाळण्यासाठी हे पाऊल शरद पवारांनी उचललेलं असावं.” असं चंद्रराव तावरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची! शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याआधी रोहित पवारांनी केलेलं ट्वीट चर्चेत
शरद पवारांनीच सगळं नाट्य घडवून आणलं आहे असा दावा
शरद पवार इतकं पुढे जाऊ शकतात का? असं विचारलं असता तावरे म्हणाले, “शरद पवार आत्ता जे करत आहेत त्याच्याही पुढे जाऊ शकतात. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला तर कुटुंबाची वाताहात होणार आहे. अडचण टाळण्यासाठी शरद पवारांनी हे सगळं घडवलं आहे. अडीच वर्षांचं सरकार झालं, त्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते सरकार पाडायची काय आवश्यकता होती? पहाटेच्या शपथविधीला काय काय घडलं हे आपल्याला माहित आहे.” चंद्रराव तावरे यांनी काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये चंद्रराव तावरे यांनी हा दावा केला आहे.
चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे जुने सहकारी आहेत. सध्या ते भाजपात आहेत मात्र त्यांनी शरद पवारांसह ४० वर्षे काम केलं आहे. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. विविध चौकशांमधून सुटण्यासाठी शरद पवारांनी हा कार्यक्रम केला आहे. असा दावा आता चंद्रराव तावरेंनी केला आहे.