शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही अशी टीका उद्धव यांनी दसरा मेळाव्यात केली. तसेच येत्या २५ नोव्हेंबरपासून मी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणाही उद्धव यांनी यावेळी केली. राम मंदिर बांधणार की नाही हे आधी भाजपाने सांगावे आणि त्यांना शक्य नसेल तर ते आम्ही बांधू असेही त्यांनी यावेळी म्हटले होते. मात्र उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्याच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. नारायण राणे, मनसेनंतर आता राष्ट्रवादीनेही उद्धव यांना आधी कल्याणजवळील दुर्गाडीचा पुल बांधा असा खोचक सल्लाच राष्ट्रवादीच्या प्रकवत्यांनी उद्धव यांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उद्धव ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यासंदर्भात शिवसेनेला ट्विटवरून सुनावले आहे. कल्याणमधील दुर्गाडी येथील पूलाच्या अपूर्ण बांधाकामाचा फोटो ट्विट करत त्यांनी आधी दूर्गाडीचा पूल बांधणार असा सवाल केला आहे. या ट्विटमध्ये तपासे म्हणतात, ‘राम मंदिर कधी बांधणार? हा प्रश्न आयोध्याला जाऊन विचारण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेब तुम्ही कल्याणला या आणि तुमच्या शिवसेनेच्या महापौराला विचारा की दुर्गाडी ब्रिज कधी बांधणार?’

या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन सहमती दर्शवली असून शिवसेनेने राम मंदिर प्रश्नामध्ये पडण्याऐवजी राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घ्यावे असे मत व्यक्त केले आहे.

दुर्गाडी पूलाची सध्याची परिस्थिती काय

दुर्गाडी पुलाचे काम गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठप्प आहे. दुर्गाडी भागात सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नवीन दुर्गाडी पुलाची उभारणी वेळेत होणे आवश्यक होते. दुर्गाडी पूल उभारणीची मुदत मार्च २०१८ मध्ये संपली. तरीही ‘मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर’च्या ठेकेदारांकडून हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. या कंपनीची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने त्यांच्याकडून दुर्गाडी पुलाचे काम होणे शक्य नाही. त्यामुळे दुर्गाडी पूल उभारणीची मुदत संपूनही काम पूर्ण करण्यात पुढाकार घेत नसलेल्या ‘मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर’चे काम तातडीने काढून घ्यावे आणि या कामासाठी नवीन ठेकेदार नेमावा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. दोनच दिवसापूर्वी देण्यात आलेल्या या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.