सत्तांतरानंतर राज्यात भाजपा शिंदे गट आणि महाविकास आघाडी असे उघड दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे विरोधाची ही धार उत्तरोत्तर तीव्र होत आहे. असे असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा >>> काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “मला…”
जयंत पाटील यांना राज्यातील काही नेत्यांमधील चांगली बाब तसेच त्या नेत्यांनी काय सुधारवणा कराव्यात असे विचारण्यात आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना “राज ठाकरे यांना टीव्हीवरच बघतो. माझा त्यांच्याशी फारसा संपर्क नाही. त्यांच्यात भाषण करण्याची चांगली कला आहे. त्यांच्या भाषणाला महाराष्ट्रातील लोक गर्दी करतात. ते वेगवेगळ्या नेत्यांच्या नकलाही चांगल्या करतात,” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी कौतुक केले. “एकनाथ शिंदे यांच्यात कष्ट करण्याची सवय जास्त आहे. ते कष्ट करण्याचा प्रयत्न करतात. सामान्यपणे ते सर्वांशीच चांगले संबंध ठेवून काम करतात,” असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >>> अजित पवार शिंदे गटावर बरसले, जाहीर सभेत म्हणाले; “बाळासाहेबांनी सांगितलं, मग…”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचंड लोकसंपर्क आहे. ते सतत नवं शिकण्याचा प्रयत्न करतात. जनतेचा प्रश्न सोडवण्यावर ते भर देतात, असेही जयंत पाटील म्हणाले. “शरद पवार यांचा सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांच्यात प्रचंड आकलनशक्ती आहे. महाराष्ट्रातच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील विषय त्यांना माहिती असतो. ते देशात काय चालले आहे, याकडे ते बारकाईने लक्ष ठेवतात. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला प्रचंड फायदा होता. ते मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आम्ही त्यांना पाहात आलो आहोत. राजकारण करण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. २२ ते २५ वर्षांचा मुलगाही काही वेगळं सांगत असेल तर शरद पवार ते ऐकतात. म्हणूनच ते सध्याच्या जगापासून तुटलेले नाहीत. ते कोणालाही टाकून न बोलता, सर्वांना सन्मान देतात. त्यांनी महाराष्ट्रात माणसं जोडलेली आहेत,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.