२१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. त्यानंतर ३० जून २०२२ या दिवशी महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सत्तेत सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. तसंच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस हे आता पूर्वीसारखे कार्यरत नाहीत असं म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी ‘टू द पॉईंट’मध्ये खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला त्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
देवेंद्र फडणवीस यांचे पंख दिल्लीश्वरांकडून कापण्यात आलेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थातच दिल्लीश्वरांकडून त्यांचे पंख कापण्यात आले आहेत. भाजपाचं नेतृत्व मी जवळून पाहिलं आहे. अटलजींचा एक कोअर ग्रुप होता, तेव्हा भाजपात लोकशाही होती. आता ते नेते कुठे आहेत? महाराष्ट्रात पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे देवेंद्र फडणवीस तेच आहेत का? तर नाही. विरोधकही दिलदार असला पाहिजे. विनोद तावडे कुठे दिसतात? पंकजा मुंडे कुठे आहेत? एकनाथ खडसेंचं काय केलं ते सगळ्यांनाच माहीत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशचं उदाहरणच मी तुम्हाला देते. शिवराज सिंग चौहान यांनीच मध्य प्रदेश जिंकून आणला. त्यांना मामा म्हटलं जातं. मात्र मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवण्यात आलं नाही. त्यांच्यावर काहीही आरोपही नाहीत. तरीही त्यांना डावललं गेलं. तसंच इथेही घडलं.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अटलजींच्या काळात भाजपात लोकशाही होती
“भाजपा आणि एनडीए जेव्हा होते तेव्हा किती पक्ष होते विचार करा. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हयात असेपर्यंत भाजपातली परिस्थिती इतकी वाईट झाली नव्हती. आता सगळ्या मित्र पक्षांनी भाजपाची साथ सोडली. कारण देतोय त्या घ्या नाहीतर टाटा बाय बाय करा असं भाजपाचं धोरण आहे. महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून आलेत भाजपाचे कुठे दिसतात ते आपल्याला. राष्ट्रवादीचे १०५ आमदार असते तर आम्ही धुडगूस घातला असता. तसंच मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला दिलंच नसतं. कारण इतकं मोठं मन माझं नाही” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रातले भाजपाचे नेते दिसतच नाहीत
“देवेंद्र फडणवीस आता पूर्वीप्रमाणे बोलत नाहीत. एका प्रश्नाचं उत्तर देतात आणि निघून जातात. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे १०५ आमदार जास्त दिसत नाहीत. उलट दादा (अजित पवार) आणि एकनाथ शिंदे यांचेच लोक जास्त दिसतात. मी पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे. त्यांची पूर्ण कमांड सरकारवर होती. ते खूप चांगले प्रशासक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांची यंत्रणा परिणामकारकरित्या चालवली. मला त्यांचं सरकार चालवणं पटलं नाही. पण त्यांनी सरकार उत्तम आहेत. त्यांनी स्वतःचा आदर्शवाद सोडला नाही.”