महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षाचे मंत्री व वरिष्ठ नेते यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाचे मंत्री व नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान या बैठकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांविरोधात नाराजी जाहीर करण्यात आल्याचंही समजत आहे. यावर बैठकीत सहभागी असलेल्या सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या
संजय राऊत यांच्याबद्दल रोष
राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांवर जाहीरपणे संशय व्यक्त करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल काही मंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पुढे विधान परिषद निवडणूक आहे, अशा वेळी अपक्षांना नाराज केले तर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?
सुप्रिया सुळेंना संजय राऊतांवरील नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादी अजिबात संजय राऊत यांच्यावर नाराज नाही. कालच संजय राऊत आणि देवेंद्र भुयार भेटले. खूप छान फोटो निघाले”.
आघाडीच्या पराभवाबद्दल शरद पवारांची नाराजी ; मंत्र्यांची कानउघडणी
सुप्रिया सुळे यांनी आज अंबादेवी आणी एकविरा देवीचं दर्शन घेतलं. “मी मांदिरात कधीही मागायला येत नाही, मी आभार मानायला येते,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असतील तर स्वागतच करेल. भारतातही नवीन पिढीला नोकरी मिळत असेल तर मनापासून मी स्वागतच करेन असंही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर भाजपाने पाठिंबा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मला याबदल काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार आहे त्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो”. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी यावेळी आभार मानले.
राहुल गांधींच्या ईडी चौकशीवर बोलताना सुप्रिया सुळेंनी दडपशाहीचे सरकार आहे जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते अशी टीका केली. विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार कोसळेल या भाजपच्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून तारखा देत आहेत, आणखी एक तारीख असा टोला लगावला.