एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना आणि नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंच्या फोनवरून ४४ वेळा फोन गेल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळेंनी केला आहे. त्यावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजयच राऊत यांनी “हा नीच आणि हलकट प्रकार” असल्याची टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून परखड भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय आहे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय, महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलीस अशा तीन तपास यंत्रणांनी तपास केला. यासंदर्भात आदित्य ठाकरेंवर टीका केली जात असताना सीबीआयनं आपल्या तपासातून आदित्य ठाकरेंना क्लीनचिट दिली. मात्र, राहुल शेवाळेंनी बुधवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा”, असा दावा शेवाळेंनी केला आहे.

“महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालं आहे”

दरम्यान, राहुल शेवाळेंच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर टीव्ही ९ शी बोलताना सुप्रिया सुळे यांनी टिप्पणी केली आहे. “महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालं आहे. यात आमच्यासारखे लोक कधी काही बोलणार नाहीत. हे अतिशय गलिच्छ आणि घाणेरडं आहे. याबाबत मी तर कधीच काही बोलणार नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं.

“शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…”, संजय राऊतांचं टीकास्र; CBI चाही केला उल्लेख!

दरम्यान, सीमाप्रश्नावरून कर्नाटकनं घेतलेल्या भूमिकेवरही सुप्रिया सुळेंनी टीका केली. “हे दुर्दैवं आहे की अमित शाह यांनी सहकार्याची भूमिका घेऊनही हे घडत आहे. अमित शाहांनी याकडे संवेदनशीलपणे पाहिलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जे वागतायत, त्यातून महाराष्ट्राचाच नाही तर अमित शाह यांच्या शब्दाचाही अपमान आहे. त्यामुळे भाजपामध्ये नेमकं काय चाललंय. अमित शाह संवेदनशीलपणे वागत आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने अमित शाह यांच्याविरोधात का बोलतायत याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाहीये”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावरून खोचक टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule slams rahul shevale on aaditya thackeray sushant singh rajput case pmw