राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील काही संदर्भ देऊनही सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या सरकारवर टीका करताना गंभीर आरोप केला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंशी असणारे संबंध आणि त्यांत आलेली कटुता याविषयी विचारणा करण्यात आली. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपांचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात पडल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी फडणवीसांच्या आरोपांना तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलेलं असताना आता सुप्रिया सुळेंनी त्यावरून फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांना पुण्यात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाचीही जाणीव करून दिली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. मला वाटतं दिलीप वळसे पाटील त्याच्यावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी. मला देवेंद्र फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की गॉसिप किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी एक गृहमंत्री म्हणून त्यांनी पुण्यातील कोयता गँग, धायरीत वादादरम्यान पिस्तुलं काढण्याच्या घटनेवर बोलावं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव, संजय पांडेंना टार्गेटच..” देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

“ते अनेक वर्षं मुख्यमंत्री राहिलेत, त्यामुळे…”

“त्यांनी हे काय कुठलं काढलंय हे त्यांनाच माहिती. माझी विनंती आहे, की देवेंद्रजी, पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तुमच्याकडे गृहमंत्रालयाचा रिपोर्ट येत असेल. कोयता गँग, धायरी, सिंहगड, दौंडचा काही भाग इथे सगळीकडे गुन्हेगारी वाढतेय असं सराकारी आकडेवारी सांगतेय. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावर बोलावं अशी आमची अपेक्षा होती. ते अनेक वर्षं मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे माझी देवेंद्र फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होती. पण मला आश्चर्य वाटलं की हे असं काय बोलतायत. असल्या वावड्यांवर बोलणं महत्त्वाचं नाहीये. राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर आहे. त्यावर त्यांनी काम करावं अशी आमची विनंती आहे”, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.