उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी काही उद्योजक तसंच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ यावेळी चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीव्ही९ शी बोलताना कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं होणार नाही. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते असं नातं आहे,” असं त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते.

योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule uttar pradesh cm yogi adityanath mumbai bollywood sgy