केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता सरकारही कारवाईच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सीपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर त्यांना दिलेले बंगले लवकरच रिकामे करण्यास सांगू शकतं. तर, तृणमूल काँग्रेसला देशाची राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालय उघडण्यासाठी दिलेल्या जमिनीवरील ताबा सोडावा लागू शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीत त्यांच्या पक्षाचं कार्यालय उघडण्यासाठी अनेक ठिकाणी जमिनी पाहिल्या. तर तृणमूलला दीन दयाळ उपाध्याय मार्गावर १,००८ चौरस मीटर इतकी जमीन देण्यात आली होती. परंतु जमीन वाटप होऊन नऊ वर्षे उलटून गेल्यानंतरही टीएमसीने त्या जमिनीचा ताबा घेतला नव्हता.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “जर टीएमसीने जमीन ताब्यात घेतली असती, तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतरही ते तिथे कार्यालय बांधू शकले असते. परंतु आता टीएमसीला जमीन मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जमीन निश्चित केली होती, तसेच त्यासाठीचं शुल्कही भरलं होतं, त्यामुळे ते आता तिथे कार्यालय बांधू शकतात.
हे ही वाचा >> राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? वीर सावरकर वादानंतर आता काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?
राष्ट्रवादीला बंगला रिकामा करावा लागणार
सीपीआय (एम) बद्दल, संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं की, डावे पक्ष त्यांचे केंद्रीय कार्यालय अजॉय भवन, कोटला मार्ग येथे कायम ठेवतील. परंतु पुराना किला रोडवरील टाइप-७ येथील बंगला मात्र त्यांना रिकामा करावा लागेल. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला पक्ष कार्यालयासाठी देण्यात आलेला 1 कॅनिंग रोडवरील बंगला रिकामा करावा लागणार आहे.