शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विरोधी पक्षाची जागा रिक्त असल्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेत संख्याबळ बघता राष्ट्रवादी काँग्रेस उद्या सकाळी सभापतींकडे दावा करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीकडे ४१ सदस्य असले तरी आमदार रवी राणा, गणपतराव देशमुख, जितेंद्र ठाकूर तीन सदस्यांविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे तीनही आमदार आमच्याकडे असल्यामुळे आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. या तीनही सदस्यांचे स्वाक्षरी असलेले निवेदन सोमवारी, सकाळी १० वाजता सभापतींना देऊन दावा करणार आहे. काँग्रेसने दावा केला असला तरी त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याचे पवार म्हणाले.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील दुष्काळ बघता राज्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे. तातडीने शेतक ऱ्यांना मदत केली पाहिजे. या विषयावर सभागृहात चर्चा करताना तात्काळ पॅकेज घोषित करा, अशी मागणी केली जाणार आहे. ५० पैसे कमी आणेवारी असलेल्या गावांना आर्थिक सहाय्य केले पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी नाही. जनतेचे मत घेतल्यानंतर आणि त्यांचा विदर्भाला पाठिंबा असला तर राष्ट्रवादी जनतेच्या पाठिशी राहील. मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला नव्हता आणि त्यांनी मागितला नव्हता. पुन्हा निवडणुका नको म्हणून पक्षाने सहकार्य केले. आम्ही पूर्वी विरोधक म्हणून आणि आता सुद्धा विरोधक म्हणून सभागृहात राहणार आहोत, असे पवार यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  चहापानाला उपस्थित राहण्याऐवजी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. त्यांना सायंकाळी जायचे होते तर सकाळी समारंभ आयोजणे शक्य होते. सन्मानाने वागणूक दिली जात नसल्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकल्याचे पवार म्हणाले.  

Story img Loader