पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून या मोहिमेत राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील नेते आमदार जयंत पाटील यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न म्हणून आष्टाचे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पूत्र विशाल शिंदे यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार वैभव शिंदे यांचा झालेला पराभवाचे कारण असले तरी गृहीत धरण्याचे राजकारणही कारणीभूत आहेच.
वाळवा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असली तरी या तालुक्यामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचाही गट अगोदरपासून कार्यरत आहे. या गटाने आतापर्यंत वाळवा पंचायत समितीच्या सत्तेत भागीदार अधिकारांने मिळविली. यातूनच शिंदे घराण्यातील विशाल शिंदे, भाग्यश्री शिंदे यांना उपसभापतीपद मिळाले.
नगरपालिकेत शिंदे घराण्याचेच वर्चस्व आतापर्यंत राहिले असले तरी यामध्ये काही अंशी आमदार जयंत पाटील यांचाही गट सहभागी राहिला. मात्र निर्णयाचे अधिकार शिंदे घराण्यातच राहिले हे नाकारून चालणार नाही. तालुक्यातील काही गावांत आजही राष्ट्रवादीअंतर्गत शिंदे गट आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवून आहे. वाळवा विधानसभेसाठी सत्तेत वाटा द्यावा लागू नये यासाठी गेली काही वष्रे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद विलासराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
राजकारणात उपयोजित मूल्य असण्यापेक्षा उपद्रव मूल्य अधिक असेल तर पद आणि राजकीय प्रतिष्ठा लवकर मिळते. हा अनुभव शिंदे घराण्याला नवीन नाही. अगदी राजारामबापूंच्या काळापासून विलासराव शिंदे हे राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत. एकेकाळी बापूंच्याविरुद्ध राजकीय संघर्ष केला. मात्र जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणात शिंदे घराण्याला मर्यादित सत्ता स्थाने देऊन राजकीय प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला गेला.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला. यामागे राजारामबापू सहकारी संस्थामधील काही व्यक्ती कारणीभूत होत्या. या शक्तीवर कारवाई करण्याचे केवळ आश्वासनच मिळाले. यामुळे शिंदे गट आजही आ. पाटील यांच्यावर नाराज आहे. या नाराजीचा लाभ भाजपाने घेण्याचे ठरविले असले तरी चुकीचे म्हणता येणार नाही.
बागणी जिल्हा परिषद गटातून वैभव शिंदे यांचा पराभव करीत असताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनाही पराभूत करण्यात आले. या दोघांना जिल्हा परिषदेत जाण्यापासून रोखण्यात आमदार पाटील यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखविले असले तरी विरोधकांचे एकत्रीकरण रोखण्याचा हा प्रयत्न होता. मात्र याचे उलटे परिणामही दिसले तर नवल वाटणार नाही अशी आजची स्थिती आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला रोखायचे असेल तर अगोदर झाडाच्या फांद्यांवर घाव घालावा लागतो. हेच सूत्र भाजपाचे दिसत आहे. याच भूमिकेतून विशाल शिंदे यांच्या भाजपाच्या मार्गावर गालिच्या अंथरण्याचा कार्यक्रम सध्या राबविला जात असून यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा खुबीने वापर भाजपाकडून केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उद्या भाजपाला ताकद मिळाली तर पक्षाची ध्येयधोरणे पटल्याने आयाराम येत असल्याचा कांगावा करायचा आणि जर बोलणी फिसकटली तर राज्यमंत्री खोत यांचेच हे प्रयत्न होते म्हणून हात झटकता येतील अशी दुहेरी खेळी यामागे आहे.
अठरा जागांचे उद्दिष्ट
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांपकी कोल्हापूरमध्ये दोन, सांगलीत चार आणि सोलापूरमध्ये दोन असे आठ आमदार भाजपचे आहेत. या चारही जिल्ह्य़ांत किमान १८ जागाजिंकण्याच्या उद्देशाने गोळाबेरीज करण्याची तयारी भाजपाने आतापासूनच सुरू केली आहे.
तडजोडीचे राजकारण?
राजकारणात उपयोजित मूल्य असण्यापेक्षा उपद्रव मूल्य अधिक असेल तर पद आणि राजकीय प्रतिष्ठा लवकर मिळते. हा अनुभव शिंदे घराण्याला नवीन नाही. अगदी राजारामबापूंच्या काळापासून विलासराव शिंदे हे राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत. एकेकाळी बापूंच्याविरुद्ध राजकीय संघर्ष केला. मात्र जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणात शिंदे घराण्याला मर्यादित सत्ता स्थाने देऊन राजकीय प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला गेला.
भाजप प्रवेशाचा विचार सध्या तरी नाही. मात्र बागणीतील पराभवामुळे पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाबद्दल नाराज जरूर आहे. भविष्यात संधी मिळाली तर वेगळा विचार मात्र होऊ शकतो.
– विशाल शिंदे, उपनगराध्यक्ष