शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी लाचार होता आणि आता मुख्यमंत्रीपदासाठीही लाचार झाला का? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधताना एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्यंगचित्रात?
अमित शाह हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या दिशेने चालले आहेत. त्यांच्या हातात मुख्यमंत्रीपद असं लिहिलेला एक केक आहे. अमित शाह चालत असताना उद्धव ठाकरे हे त्यांचा सदरा धरून मागे फरफटत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते असा मथळाही या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे म्हणूनच शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही अशी टीका गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर विरोधकांकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचा विजय झाला तर मुख्यमंत्री कुणाचा होणार? यावरून खल सुरू आहे. दरम्यान अमित शाह यांनी रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र शिवसेनेची ही नाराजी नाही तर लाचारी आहे अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp tweets cartoon against shivsena scj