मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असून त्यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने निघाले असून वाटेत त्यांनी आधी पुण्यात काही भेटीगाठी घेतल्या. यादरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मांडलेला मुद्दा आणि त्यानंतर मनसेकडून आक्रमकपणे हनुमान चालीसा वाजवण्याची केली गेलेली मागणी यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रविकांत वरपे यांनी राज ठाकरें यांच्यावर टीका करतानाच त्यांचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलताना दिसत आहेत. या ट्वीटसोबत रवीकांत वरपे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा”, असं ट्वीट या व्हिडीओसोबत रविकांत वरपे यांनी केलं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये रवीकांत वरपे यांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ दाखवून त्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे संभाजी महाराजांविषयी बोलत आहेत. “संभाजी राजे वडिलांशी भांडून मुगलांना मिळाले होते हेही तितकंच सत्य आहे. ज्यांच्याविरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हे सत्यच आहे”, असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
“राज ठाकरेंनी नाक रगडून माफी मागावी”
दरम्यान, या व्हिडीओबाबत बोलताना रवीकांत वरपे यांनी राज ठाकरेंनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे. “राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. हा इतिहास खूप जुना आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी जशी शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्याच पद्धतीने राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. ही गुरु-शिष्याची परंपरा जुनी आहे. आज राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, नाक रगडून राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी माहितली पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो”, असं रवीकांत वरपे म्हणाले आहेत.