दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादीचा आता आक्रमक पवित्रा
विधानसभा निवडणुकीला अजून अडीच वष्रे शिल्लक असली तरी दापोली मतदारसंघात मात्र आतापासूनच राजकीय नेत्यांची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यानिमित्ताने चिरंजीव योगेश आणि सिद्धेश यांचा राजकीय ‘फोकस’ वाढवला असून दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी स्वत:चा राजकीय ‘वारसदार’ निश्चित करण्यात अपयशी ठरल्याने दापोली मतदारसंघासाठी पक्षात इच्छुक नेत्यांची संख्या वाढली होती. मात्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चिरंजीव योगेश आणि सिद्धेश यांच्यासाठी मतदारसंघावर उघडपणे दावा केल्याने आता अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यातच रामदास कदम यांनी योगेश आणि सिद्धेश यांच्या उपस्थितीत दापोलीत अनेक विकास कामांचे भूमिपूजन करत राजकीय ‘वारसदारा’ला स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आणण्यास सुरुवात केली आहे. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर जोरदार टीका करून त्यांच्या समर्थकांचे खच्चीकरण करण्यातही रामदास कदम यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या बाजूला आमदार संजय कदम यांनी शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून नागरिकांमधील नाराजी समजून घेण्याला प्राधान्य दिले आहे. दापोली पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असल्याने आमदारांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे आमसभेचे नियोजन गेली दोन वष्रे टाळण्यात आले होते. त्यामुळे तातडीने आढावा बठक घेऊन आमदार संजय कदम यांनी शिवसेनेने केलेली राजकीय कोंडी दूर केली. या वेळी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना विविध समस्यांवरून फैलावर घेत नागरिकांमध्ये अनुकूल प्रभाव पाडला. रामदास कदम यांनी राजकीय वारसदारांसाठी सुरू केलेल्या आक्रमक प्रचार मोहिमेमुळे संजय कदमदेखील विकास कामांबाबत पुढील काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.