पदवीधर विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघाचा आमदार म्हणून १९ जुलै २००८ रोजी पदग्रहण केल्यापासून सभागृहात शंभरटक्के उपस्थिती असणारा मी पदवीधरांचा प्रतिनिधी आहे. माझ्या सहा वर्षांच्या कालावधीत पदवीधरांच्या व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृह बंद पाडण्याचा करिश्मा आपण केला असल्याचे ठळकपणे नमूद करून, भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांवरच विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक नियोजनासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते. पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार अॅड. भरत पाटील, श्री पेंढारकर, किशोर गोडबोले, सुवर्णा पाटील, विष्णू पाटसकर, विजय काटवटे, नितीन वास्के आदी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठकीला उपस्थिती होती.
आमचे विधानपरिषदेचे उमेदवार ८ महिन्यांपूर्वीच जाहीर झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजही अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार म्हणून ते बळीचा बकरा कोणाला करणार अशी टीका चंद्रकांतदादांनी केली. ते म्हणाले, की ‘पदवीधर विकास’ हे मासिक व कार्य अहवाल पुस्तिकेच्या माध्यमातून मी गेल्या सहा वर्षांत केलेल्या कामाचा ताळेबंद मांडला आहे. पदवीधर मतदारांच्या यादीत कमालीच्या चुका असून, सध्याच्या मतदारयादीत दुबार नोंद असल्याने ७० हजार नावे कमी होतील. या यादीत १३ हजार मयत मतदारांची नावेही तशीच राहिली आहेत. तर, पदवीधर तत्सम दर्जा नसतानाही ८ हजार युवकांना मतदार यादीत संधी दिल्याने ही एकंदर सर्व १ लाख नावे कमी होऊन सुमारे ५ लाख पदवीधर मतदारांची यादी अंतिम राहील. वरील नावे मतदार यादीतून वगळण्यासंदर्भात येत्या दोनच दिवसांत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांशी आपली चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या कामाची माहिती देताना, ते म्हणाले, आपल्या फंडातून आजवर १ हजार ८०० संगणक संच शाळांना दिले असून, अचारसंहिता संपताच त्यात दोनशे संगणक संचांची वाढ होईल. मतदारसंघातील सर्व पाचही जिल्ह्यांत आपला जनसंपर्क व कार्य सतत राहिले असून, २३ कोटींचा निधी आपण आणला आहे. गत २००८ च्या निवडणुकीत ३ लाख ९३ हजार पदवीधर मतदारांपैकी १ लाख ३५ हजार म्हणजेच सुमारे ३५ टक्के मतदान झाले होते. मात्र, १३ हजार पदवीधरांची मते बाद झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वैद्य १ लाख २२ हजार मतदानापैकी आपणास ५३ हजार तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास ४४ हजार व त्या वेळच्या विद्यमान पदवीधर आमदारास २१ हजार मते मिळून मी ९ हजार मताने विजयी झालो होतो. यंदा मतदार जागृतीमुळे मतदानाची टक्केवारी पस्तीवरून पन्नास टक्के होईल. म्हणजेच होणाऱ्या अडीच लाख मतांपैकी विजयासाठी १ लाख मतांची आवश्यकता आहे. आपण प्रथम पसंतीच्या कोटय़ातूनच विजयी होण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले. कायम विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ हा शब्द काढण्यास शासनाला भाग पाडण्यात आपण आघाडीवर होतो. शाळांना वेतन अनुदानाच्या प्रस्तावित पाच टक्के वेतनेतर अनुदानासाठी आपण लढा दिला आहे. शासनाची नोकरीविषयक कार्यालये त्या-त्या ठिकाणीच असावीत, जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याचे एकंदर काम शाळेतूनच व्हावे. सुशिक्षित बेकारांना वर्षांत नोकरी न मिळाल्यास ५ हजार रुपये भत्ता मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून, त्यासाठी पुढेही आपला लढा राहणार आहे. पदवीधरांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत व लढत राहिलो असून, सभागृहात एकही दिवस अनुपस्थित राहिलो नाही, ही आपली निश्चितच जमेची बाजू असल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस बळीचा बकरा कोणाला करणार – चंद्रकांतदादा
पदवीधर विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघाचा आमदार म्हणून १९ जुलै २००८ रोजी पदग्रहण केल्यापासून सभागृहात शंभरटक्के उपस्थिती असणारा मी पदवीधरांचा प्रतिनिधी आहे.

First published on: 08-05-2014 at 03:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp who will scapegoat chandrakant dada