लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. याबाबत पांडुरंगाकडे मागणे मागण्याचा विषय येत नाही. अजितदादा, प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब आणि आपण सामुदायिक निर्णय घेऊन ‘एनडीए’मध्ये गेलो आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केले. तसेच रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचेही ते या वेळी म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसत आहेत. तर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असा प्रश्न तटकरे यांना विचारला असता दोन्ही एकत्र यावेत याबाबत पांडुरंगाला मागणे मागण्याचा विषय नाही. आम्ही एकदिलाने सर्व निर्णय घेतो. एक विचार, विकास हा दृष्टिकोन ठेवून एकत्र काम करत आहोत. येत्या काळात मोदीजी आणि अमित शहा यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू. त्यामुळे या विचारांशी सहमत असतील, तेच आपल्या सोबत असतील, असे सांगत तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर पत्रकारांनी अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला का, या प्रश्नावर उत्तर देताना तटकरे यांनी आपण सात्त्विक भावनेने विठ्ठल दर्शनासाठी आलो आहोत. मी कूपमंडूक प्रवृत्तीचा नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या दारी रायगड पालकमंत्रिपदाचा आपल्या मनात प्रश्न नाही, असे सांगत अद्यापही हा तिढा सुटला नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत तटकरे यांनी दिले आहेत.

धनंजय मुंढे यांनी गेल्या आठवड्यात जनता दरबार भरवला होता. त्यामुळे सक्रीय नाही असे म्हणणे चुकीचे आहे असे म्हणत मुंढे यांनी पाठराखण केली. राजकीय भाष्य टाळत, आपण तुळजापूर, अक्कलकोट येथील श्री स्वामी महाराज आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलो आहे, असे सांगत अनेक प्रश्नांना बगल दिली. दरम्यान, तटकरे यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे सहपरिवार दर्शन घेतले. देशातील बळीराजा सुखाने राहू दे. त्यांची संकटे दूर कर, अशी प्रार्थना त्यांनी केली. वर्षातून एकदा पंढरीच्या दर्शनाला वेळ काढून येतोच. तेवढीच ऊर्जा मिळते, अशी तटकरे यांनी भावना व्यक्त केली.