भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसाढवळ्या दरोडा टाकतात, अशी टीका पडळकरांनी केली. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा अनिता भामरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकरांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनिता भामरे यांनी दिला. गोपीचंद पडळकर हे स्वत: मंगळसूत्रचोर आणि पाकीटचोर आहेत. आता तेच दुसऱ्यांना चोर म्हणत आहेत, अशी बोचरी टाकी भामरे यांनी केली. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.
हेही वाचा- ईडी कारवाईनंतर हसन मुश्रीफ भाजपात जाणार? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ खुल्या ऑफरबाबत म्हणाले…
पडळकरांच्या टीकेबाबत विचारलं असता अनिता भामरे म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत जे बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा निषेध करते. पडळकर हे स्वत: मंगळसूत्रचोर आणि पाकीटचोर आहेत आणि ते दुसऱ्यांना चोर म्हणतात. शरद पवारांवर टीका करण्याची यांची लायकी तरी आहे का?” असा सवाल भामरे यांनी विचारला.
हेही वाचा- “माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”, कशेडी घाटातील दरीचा उल्लेख करत रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट
“मी गोपीचंद पडळकरांना एकच इशारा देते, गोपीचंद पडळकरांनी नाशिक शहरात येऊन दाखवावं, त्यांना आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीने त्यांना मागच्या दरवाज्यातून आमदार केलं आहे. त्यांनी आमदार म्हणून जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. त्यांनी पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वक्तव्य करणं थांबवावं. त्यांनी पुन्हा असं बोलल्यास आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा धमकीवजा इशारा अनिता भामरे यांनी दिला.