लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत बारामतीत लोकसभेला झाल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला तर सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याच्या चर्चा सुरु आहेत.
लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते मतदारसंघातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. मात्र, त्याआधी बारामतीमधील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे. “आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे”, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : “राम मंदिर बांधल्याचा आनंद, मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन, पण मोदींनी…”, शरद पवारांची टीका
कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे काय मागणी केली?
शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना गोविंद बागेत त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते आले. यावेळी या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेची निवडणूक पाहता बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी केली. कार्यकर्त्यांनी म्हटलं, “आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे”, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवारांकडे केली.
शरद पवार काय म्हणाले?
‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, युगेंद्र पवारांना संधी द्या’, अशी मागणी बारामतीच्या काही कार्यकर्त्यांनी केली. यावर शरद पवार म्हणाले, “उमेदवारीची चर्चा आता करु नका. लवकरच काय ते होईल. संयमी राहा”, असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसारखं विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का? याबाबत आता बारामतीच्या राजकारणात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. तसेच शरद पवार गट अजित पवार यांना पुन्हा एकदा मोठं आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.