दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असले, तरी रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते यांच्या उमेदवारीला या मतभेदांचा कोणताही परिणाम जाणवणार नाही, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे. त्यातच त्यांच्याविरोधातील संभाव्य उमेदवार सुनील तटकरे हे जिल्ह्याबाहेरचे उमेदवार म्हणून येथे लादले गेल्यास राष्ट्रवादीची तथाकथित व्होटबँकही अस्ताव्यस्त होईल. साहजिकच या मतदारसंघात आघाडी घेण्यासाठी अनंत गीते यांच्याविरोधातील मोहिमांचे मार्ग राष्ट्रवादीसाठी अरुंद असल्याचे स्पष्ट होत आहे. पण तटकरे यांना त्यावर वेगळीच शक्कल शोधावी लागणार आहे.
खेडमध्ये शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्याविरोधात पक्षांतर्गत मतभेद तीव्र होत गेल्याने या तालुक्यातील त्यांच्या वर्चस्वाला गेल्या पाच-सहा वर्षांत मोठा फटका बसला. मनसेच्या माध्यमातून वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादीच्या रूपाने संजय कदम यांची नेतृत्वातील मुसंडी त्याच राजकीय परिस्थितीचा परिपाक ठरला. त्याच पद्धतीने दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांनाही पक्षांतर्गत विरोधाला सध्या सामोरे जावे लागत आहे.  खेडमध्ये कदम यांची एकाधिकार कार्यशैली पक्षासाठी नुकसानीची ठरली, तर दळवी यांचे मधुरभाषी नकारात्मक राजकारण पक्षांतर्गत मतभेदाला कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे खेड आणि दापोली या दोन्ही तालुक्यांतील जुनेजाणते निष्ठावंत कार्यकत्रे-नेते व्यक्तिनिष्ठ विचारातून पक्षापासून दुरावले आहेत. पण अनंत गीते यांना मात्र या दुष्परिणामांचा कोणताच फटका बसणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुळात अनंत गीते हे कुणबी समाजाचे असल्याने या कुणबीबहुल मतदारसंघातील त्यांचा संपर्क आणि वर्चस्व अनन्यसाधारण आहे. त्यातही या नेत्याने देशपातळीवरील नेता म्हणून नाव कमावताना मतदारांमध्ये स्वत:ची जंटलमनची प्रतिमा कायम टिकवून ठेवली आहे. पूर्वाश्रमीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघापासून त्यांनी आपले राजकीय संतुलन राखून ठेवल्याने पक्षांतर्गत मातब्बर नेत्यांकडून अथवा दबावगटाकडून त्यांना कधीच थेट विरोध झालेला नाही. याच पाश्र्वभूमीवर गेल्या वेळी त्यांची रायगड लोकसभा मतदारसंघातील नवीन उमेदवारी अग्निपरीक्षा घेणारी ठरत होती. यामध्ये अर्थातच दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या व्होटबँकेसह इतर पक्षांचे मतदारही काँग्रेसच्या बॅ. अ. र. अंतुले यांच्याविरोधात गीते यांच्या पाठीशी राहिल्याचे चित्र दिसले. त्यावेळच्या काँग्रेसऐवजी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस त्यातही हेवीवेट सुनील तटकरे िरगणात उतरण्याची शक्यता असल्याने गीते यांची गुंतागुंत वाढली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील भागात गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीनेही प्रभाव वाढवला आहे. त्यामुळे गीते यांचे मताधिक्य या विभागातून सध्या तरी खाली घसरल्याची चिन्हे आहेत. मात्र गीते यांच्या बाजूने उभी राहणारी भाजपच्या विनय नातू यांची व्होटबँक आणि दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे यांच्याबाबत नाराज असलेला प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा दबावगट अधिक सक्रिय झाल्यास त्याचा फायदा अर्थातच गीते यांना होऊ शकेल.
अर्थात गीते यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील संपर्काबाबत अधिक भर दिला होता. तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीने यंदा ही मोहीम अधिक सूक्ष्म पद्धतीने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. साहजिकच रत्नागिरीतून अनुकूल-प्रतिकुलाच्या संमिश्र परिस्थितीबरोबरच रायगडमधील दबाव मातब्बर अनंत गीते कसा हाताळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा