राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठेने काम करत आहे. एखादी चुक झाली असेल अथवा काही वेगळे मत तयार होत असेल तर पक्षाने त्याची नोंद घेऊन ती चुक सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आघाडीत यशाचे श्रेय काँग्रेस घेते आणि राष्ट्रवादीला अपयशाचे धनी व्हावे लागते, या प्रश्नावर त्यांनी उपरोक्त विधान केले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. सुळे यांनी शनिवारी सकाळी शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेतला. दुपारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आयोजित ‘सायबर क्राईम व मोबाईल टॅपींग’ चर्चासत्रात मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. सुळे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. परंतु, राज्यात काही ठिकाणी तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाहीत. ही बाब मान्य करत त्यांनी पोलीस यंत्रणेमध्ये जागरुकता वाढविण्याची गरज व्यक्त केली. पुण्यात पोलिसांकडून अशी चुक झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या माध्यमातून योग्य तो संदेश देण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे काम पुढील दोन वर्षांत खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात दिसू लागेल. राज्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ती निर्माण करण्याचे नियोजन आहे. आगामी निवडणुकांमध्ये महिलांना किती जागांवर राष्ट्रवादी उमेदवारी देणार या प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र खा. सुळे यांनी असमर्थतता व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा