आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या १७ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर त्यांची सुटका झाली आहे. नवाब मलिक हे तब्बल १७ महिने तुरुंगात हते. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ते तुरुंगात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. आता या पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांचा एक गट जो सध्या सत्तेत सहभागी झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आणि शरद पवारांचा एक असे दोन गट पडले आहेत. शरद पवारांचा गट विरोधात (महाविकास आघाडीमध्ये) आहे. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील अनेक नेते सोमवारपासून नवाब मलिक यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांनी आज (१५ ऑगस्ट) नवाब मलिक यांची भेट घेतली. तर शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील नवाब मलिक यांची भेट घेतली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनीदेखील अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर चव्हाण यांनी नवाब मलिक हे अजित पवारांच्या पाठिशी उभे राहू शकतात असं वक्तव्य केलं आहे.
सुरज चव्हाण म्हणाले, दिड वर्षांनंतर आज आमची नवाब मलिक यांच्याशी भेट झाली. त्यांना पाहून आनंद झाला. सध्या आरोग्य हीच त्यांची प्राथमिकता असायला हवी. हेच आम्हा सगळ्यांचं मत आहे. राजकारण होत राहील, परंतु आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. आमच्या वरिष्ठांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी म्हटलंय की नवाब मलिक यांनी आधी आरोग्य सुधारावं. नवाब मलिक यांनी लवकरात लवकर बरं व्हावं असंच आम्हाला वाटतं.
हे ही वाचा >> नवाब मलिकांचं तुरुंगात तब्बल ‘इतकं’ वजन घटलं, भाऊ म्हणाला, “देवाची कृपा म्हणून…”
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांचा राजकीय अनुभव पाहता ते आगामी काळात योग्य निर्णय घेतील. ते आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांची निर्णयक्षमता चांगली आहे. आम्ही त्यांचं राजकारण पाहिलं आहे. त्यांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं आहे. मला विश्वास आहे की ते भविष्यात विकासाच्या बाजुने येतील. अजित पवार यांनी जो निर्णय घेतला आहे ते (नवाब मलिक) त्या निर्णयाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील.