भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. संबंधित नेत्याची भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे, असंही कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कंबोज यांनी केलेले हे ट्वीट्स सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहेत.