सांगली जिल्ह्यात रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक ११० गावात वर्चस्व सिध्द केले आहे. त्यापाठोपाठ भाजपाने ९५ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता संपादन केली आहे.
हेही वाचा- अकोला जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले!, राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे
मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली. सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला ५० ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली असून यापैकी बहुंताशी ग्रामपंचायती पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर-आटपाडी मतदार संघामध्ये ३२ ग्रामपंचायती जिंकल्या, तर उ.बा. ठाकरे शिवसेनेने ८ ठिकाणी विजय मिळवला. स्थानिक आघाड्यांनी ९० ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली आहे, तर उर्वरित गावामध्ये संमिश्र निकाल मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही काही सदस्य आघाडीतून जत तालुक्यात निवडून आले आहेत.