कणकवली नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला नमविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेना व भाजपने शहर विकास आघाडी निर्माण केली आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतून संदेश पारकर यांना प्रवेश दिल्याने कणकवली नगर पंचायत निवडणुकीत मतदारापर्यंत कोणता संदेश जातो हेही निवडणूक ठरविणार आहे. दरम्यान, शहर विकास आघाडीच्या भाजपच्या उमेदवार राजश्री धुमाळे बिनविरोध झाल्याने काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.
कणकवली नगर पंचायत निवडणुकीचे चित्र राज्यभर पसरले आहे. त्या वेळी संदेश पारकर राष्ट्रवादीत होते. नारायण राणे यांना विरोध करणारे अस्त्र संदेश पारकर रूपाने कणकवलीत होते. हेच अस्त्र नारायण राणे यांनी काँग्रेस प्रवेश देऊन मॅन केले असल्याने या निवडणुकीत रंगत येत आहे.
कणकवलीची निवडणूक म्हटल्यावर श्रीधर नाईक व सत्यविजय भिसे यांच्या खुनाचा मुद्दा हा प्रचारात असतोच. आज त्यांचे वारस शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळ भिसे हे या शहर विकास आघाडीत आहेत. त्यामुळे या मुद्दय़ावर संदेश पारकरना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप शहर विकास आघाडीने प्रचारात भर देण्याचा मनसुबा रचला आहे.
शिवसेनेत असताना कणकवली नगर पंचायतीत नारायण राणे यांना सत्ता स्थापन करता आली नव्हती, पण नंतर काँग्रेस-प्रवेश केल्यावर कणकवलीकरांनी नारायण राणे यांना स्वीकारलेदेखील. गेली पाच वर्षे कणकवलीत राणे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक कारभार करीत होते. संदेश पारकर आणि कणकवली शहराचा तोवर नारायण राणे यांनी अभ्यास केला होता. त्यांच्यासोबत असणारे शिलेदार कणकवली नगर पंचायतीत हमखास यश मिळवून देतील, असा राणे यांना विश्वास नसल्याने त्यांनी संदेश पारकरना काँग्रेस प्रवेश दिला. त्यांनी राजकारणातील मागील सर्व तंटे किंवा मानहानी विसरत राजकारणात पुढचे पाऊल टाकत संदेश पारकर यांच्या जवळच्या दहा जणांना उमेदवारीही दिली.
शिवसेना व आता काँग्रेसमध्ये नारायण राणे यांचे आदेश मानून काम करणारे त्यांचे समर्थक गेली २५ वर्षे संदेश पारकर यांच्याशी रस्त्यावर व न्यायालयात लढले ते सर्व विसरून कणकवली नगर पंचायत निवडणुकीत एकजुटीने काम करीत असल्याचे चित्र आहे, असे सांगण्यात येत असले तरी मन दुखावणारी नाराजी लपवून ठेवता येण्यासारखी नाही. त्यामुळे अशा दु:खी चेहऱ्यांना राणेअस्त्राने घायाळ केले जाणार असल्याचे बोलले जाते.
राजश्री धुमाळे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां. तत्कालीन खासदार कर्नल सुधीर सावंत यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या राजश्री धुमाळे भाजपत तर वैभव नाईक शिवसेनेत दाखल झाल्या. काँग्रेसच्या तेजश्री डिचोलकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली गेल्याने तो अर्ज अवैध ठरला आणि राजश्री धुमाळे बिनविरोध विजयी ठरल्या.
शहर विकास आघाडीने राजश्री धुमाळे यांच्या रूपाने एका जागी विजय मिळविला. आता १६ जागी निवडणूक होणार आहे. सध्या ५६ उमेदवार रिंगणात आहेत. शहर विकास आघाडीच्या प्रचारात भाजप आमदार प्रमोद जठार, राष्ट्रवादी आमदार दीपक केसरकर यांनी सुरुवात केली आहे.
काँग्रेसविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी घरोबा करून नारायण राणे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे, तोच एक चर्चेचा विषय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा