बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महिना लोटला तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही. एक आरोपी अद्याप फरार असून अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी बीडमध्ये भव्य मोर्चे निघाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरतेय. दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे.
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, असं शरद पवार म्हणालेत. तसंच, लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरावावं, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शरद पवारांनी पत्रात काय म्हटलंय?
“मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडानी अपहरण करून निघृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोशमोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025
लोकप्रतिनिधींना संरक्षण पुरवा
“संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली, अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटनेविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे”, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.