Jitendra Awhad on Mahant Ramgiri: मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वत्तव्य केल्याच्या आरोपावरून सराला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मंहत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला असून रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि काही जिल्ह्यात या मागणीवरून तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या रामगिरी महाराजांच्या वार्षिक सप्ताह सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी चालू आहे. याच दरम्यान महाराजांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत विधान केले असल्याचे सांगितले जाते. महंत रामगिरी यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वादग्रस्त वक्तव्याबाबत महंतांचा निषेध करत याबाबत गुन्हा दाखल करावा यासाठी ठिकठिकाणी मुस्लीम समाजाने निषेध आंदोलन केले.

हे वाचा >> Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता, हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे. कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही.”

कोण आहेत रामगिरी महाराज?

अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्याला खेटून गोदावरी नदी किनाऱ्यावरील सराला बेट या ठिकाणी संत गंगागीर महाराजांचा मठ आहे. लोकजागृतीच्या उद्देशाने साधारण दीडशे, पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात. महाराष्ट्रभर मठाच्या अनुयायांचे मोठे जाळे आहे. गंगागिरी महाराज यांचे निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली. साधारण पंधरा वर्षांपासून रामगिरी महाराज मठाधिपती म्हणून कामकाज पाहत आहेत.

संताच्या केसांनाही धक्का लागणार नाही – मुख्यमंत्री

राज्यभरातून महंत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांची बाजू सावरली आहे. “महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही”, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानतर्फेसिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpsp leader jitendra awhad slams mahant ramgiri maharaj on his offensive statement against prophet muhammad kvg