Sharad Pawar Solapur Speech: सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांना तंबी दिली. शरद पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदे ८४ वर्षांचे झाले आहेत. माझ्यापेक्षा साधारण आठ महिन्यांनी ते लहान आहेत. पण आताच बघा ते कसं वागतात. त्यांच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्काराचं भाषण शेवटी असतं. पण माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं त्यांनी माझ्याआधी भाषण करण्याचा हट्ट केला. शेवटी मला त्यांना सांगावं लागलं मी तुमच्यापेक्षा आठ महिन्यांहून थोरला आहे. त्यामुळं माझ्या नादी लागू नका. तुमच्या सन्मानासाठी हजारो लोक याठिकाणी आले आहेत.”

अकलूज येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे की, मोहिते परिवाराने हा प्रचंड सोहळा याठिकाणी आयोजित केला. शिंदे यांचा आयुष्यातील मोठा काळ सोलापूरमध्ये गेला. शिंदे यांनी प्रचंड संघर्षामधून वाटचाल केली. पोलीस शिपायाची नोकरी, त्यानंतर आमदार, मंत्री, खासदार, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री होईपर्यंत त्यांनी मजल मारली. एवढी प्रगती सर्वांच्या आयुष्यात होत नाही. मीही अनेक वर्ष संसदेत आहे. पण सुशीलकुमार शिंदेंएवढा वेगळेपणा मला अनुभवता आला नाही.

हे वाचा >> मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती

“सुशीलकुमार यांनी अनेक उद्योग केले. त्यांनी कधी नाटकात काम केले. पुण्यातील विधी शाखेत शिक्षण घेतलं. पोलीस खात्यात नोकरी केली. एकदिवशी मी त्यांना सांगतिलं, सुशीलकुमारची खाकी सोडा आणि नेत्याचा गणवेष घाला. माझे त्यांनी ऐकले. सुशीलकुमार शिंदेंसाठी आम्ही करमाळा विधानसभा मतदारसंघ निवडला होता. काँग्रेस नेतृत्वाकडे आम्ही उमेदवारी मागितली, पण तेव्हा ती मिळू शकली नाही. तोपर्यंत सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. राजकारणासाठी नोकरी गेली, याचं मला अधिक वाईट वाटत होतं”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

शरद पवार पुढे म्हणाले, “माझ्या मनात अपराधीपणाची भावना असताना सुशीलकुमार शिंदेंनी मलाच उलट धीर दिला. आपण यातून बाहेर पडू, असे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने करमाळ्याचे तत्कालीन आमदार काही महिन्यांनी वारले. करमाळ्याची जागा रिक्त झाली. मग आम्ही पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेलो. सुशीलकुमार शिंदे यांना यावेळी संधी देणं गरजेचं आहे, असे सांगितलं. सुशीलकुमारांना तिकीट मिळालं आणि त्यांचा विजय झाला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे कधीही थांबले नाहीत. त्यांची तिथून प्रगती सुरू झाली.”

हे ही वाचा >> “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, राजकीय आयुष्यात अधूनमधून माझ्या हातून चुका झाल्या. परंतु प्रत्येक वेळी शरद पवार यांनी या चुका पदरात घेतल्या. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात राहूनही पवारांनी मला कधीही अंतर दिले नाही. मी पुढे जात असताना कधीही मागे खेचले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा काकणभर जास्त त्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि प्रोत्साहन दिले. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर ते पंतप्रधान झाले असते, असेही शिंदे यांनी सांगून टाकले.