Rohit Patil on Sharad Pawar: राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पवार हे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सांगली लोकसभेचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि जिल्ह्याचे मातब्बर नेते संजयकाका पाटील यांचा तब्बल २७,६४४ मतांनी रोहित पाटील यांनी पराभव केला. रोहित पाटील यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी तासगाव कवठे महांकाळ येथे सभा घेतली होती. या सभेत त्यांनी आर. आर. पाटील यांच्या जुन्या गोष्टी काढून आबांनी पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण सांगितली. या टीकेनंतरही रोहित पाटील यांचा विजय झाला. २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली, तेव्हा कोणत्या गटात जायचे? असा प्रश्न होता. पण आजीने सज्जद दमच दिला होता, अशी आठवण रोहित पाटील यांनी सांगितली आहे.
एबीपी माझाच्या माझा कट्टा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेली फू आणि त्यानंतर शरद पवार यांच्याबरोबर थांबण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केले आहे. “२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. सायंकाळी शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर मी मतदारसंघातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पदाधिकाऱ्यांना लोकांची भावना काय आहे? याची कल्पना दिली. तसेच काही लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन काय केले पाहीजे, याची माहिती घेतली. शरद पवारांचे माझ्या मतदारसंघावर खूप उपकार आहेत. कर्जमाफी, फलोत्पादन वाढविण्यासाठी मदत, पाणी आणणे अशी अनेक प्रकारची कामे त्यांनी केली होती”, अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली.
“शरद पवारांनी तासगाव कवठे महांकाळसाठी वेळ दिलेला होता. तसेच त्यांचा मतदारसंघात चांगला कनेक्ट होता. तसेच शरद पवारांना सोडू नको, हे सर्वात आधी कुणी सांगितले असेल तर माझ्या आजीने सांगितले होते. आजी ग्रामीण भाषेत म्हणाली की, ‘काय बी झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही, नायतर तुला घरात घेणार नाही.’ हेच तिने चुलत्यांनाही सांगितले”, अशी आठवण रोहित पाटील यांनी सांगितली. त्यानंतर काही दिवसांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ शरद पवार येत असल्याचा फोन रोहित पवार यांनी केला होता. कराड येथे दोन हजार लोकांना घेऊन मी पोहोचलो होतो. त्याच दिवशी माझी भूमिका मी स्पष्ट केली, असेही रोहित पाटील म्हणाले.
आजी आम्हाला जमिनीवर आणते
आजीबद्दल सांगताना रोहित पाटील पुढे म्हणाले, माझी आजी ९० वर्षांची आहे. आजह ती शेतात जाते. तिची बुद्धी आजही तल्लख असून ती हजरजबाबी आहे. आम्ही जर काही फूट हवेत गेलो तर ती लगेच आम्हाला जमिनीवर आणते. वडील आर. आर. आबांच्या बाबत ती फार हळवी आहे. आजही जर आबांचे जुने सहकारी भेटायला आले तर तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आबांच्या आठवणीत ती रडू लागते.