Uttam Jankar on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची त्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे मतदान टळले. त्यानंतरही जानकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. आता त्यांनी अजित पवार यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ईव्हीएमचा अभ्यास केला असून महायुतीला राज्यात बहुमत मिळालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीमधील तीनही पक्षांना किती जागा मिळाल्या याचे गणितच त्यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उत्तम जानकर?

आमदार उत्तम जानकर यांनी आज बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ईव्हीएममध्ये गडबड होत असून याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे. व्हीव्हीपॅटमधून जी पावती बाहेर येते, ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकले, अशी परवानगी देण्याची मागणी जानकर यांनी केली.

हे वाचा >> ईव्हीएम मशीन कशी काम करते? त्यातून मतदान कसे होते? अधिकाऱ्यांनी Video तून दिली माहिती

उत्तम जानकर पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जवळपास १५० मतदारसंघात गडबड झालेली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते. अजित पवार यांना एक लाख ८० हजार मते मिळालेली आहेत. त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना ८० हजार अधिक ६० अशी एक लाख ४० हजार मते मिळालेली असून अजित पवारांना केवळ १ लाख २० हजार मते उरतात.

हे ही वाचा >> ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया

अजित पवारांचे फक्त १२ आमदार निवडून आले

यापुढे जाऊन उत्तम जानकर म्हणाले की, अजित पवार गटाचे केवळ १२ आमदार निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे केवळ १८ आमदार निवडून आलेले आहेत. तर भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीची एकूण संख्या १०७ एवढी होते, दोन-तीन अपक्ष मिळून ते ११० पर्यंतच पोहोचतात. याबाबत मी सर्व मतदारासंघाचा बारकाईने अभ्यास केला असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpsp mla uttam jankar big claim on ajit pawar baramati constituency victory says he is defeated but evm temper kvg