Rohit Pawar on Sanjay Raut: दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दिल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. तसेच एकनाथ शिंदेंनीही शरद पवार यांच्या गुगलीचा उल्लेख करत मला त्यांनी कधीच गुगली टाकली नाही, असे म्हटले. दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार द्यायला नको होता, अशी भूमिका मांडली आहे.

संजय राऊत म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो.”

“ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळे असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे आणि अजित पवारांचे गुफ्तगु होत असेल, पण याचे भान राखून आम्ही पुढचे पाऊल टाकतो”, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक

संजय राऊत यांच्या नाराजीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट टाकून आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला.”

“पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी”, असेही रोहित पवार म्हणाले.

Story img Loader