सांगली : विट्याजवळ कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये सांगली पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करत २९ कोटी ७३ लाखांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुजरातच्या एका तरुणासह तिघांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ या ठिकाणी तयार करून त्याची तस्करी केली जात होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत घुगे यांनी सांगितले, अमली पदार्थ तस्कारी, उत्पादन याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तैनात केली आहेत. या पथकातील संदीप टिगरे यांना कार्वे औद्योगिक वसाहतीतील रामकृष्ण माउली नावाच्या कारखान्यातून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, विटा पोलीस ठाणा प्रभारी धनंजय फडतरे यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह नेवरी रस्त्यावर सापळा लावला. या वेळी कारखान्यातून हुंडाई आय- २० (एमएच ४३ एएन १८११) ही मोटार बाहेर पडली. या मोटारीत चालकासह बलराज अमर कातारी (वय २४ रा. साळशिंगे रोड) याला ताब्यात घेऊन मोटारीची झडती घेतली असता आतमध्ये मेफेड्रोन या अमली पदार्थाची पांढरट, पिवळसर रंगाची भुकटी प्लास्टिक बॅगमधून नेली जात असल्याचे दिसून आले.

त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्याची झडती घेण्यात आली असता त्या ठिकाणीही तयार अमली पदार्थ आणि तयार करण्यासाठी लागणारे रसायन याचा साठा मिळाला. यामध्ये ६ कोटी १२ लाखांचे तयार ३ किलो ६० ग्रॅम मेफेड्रोन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडने भरलेले ड्रम, निळ्या रंगाच्या क्लोरोफॉर्मने भरलेले ड्रम, अडीच किलो काचेच्या बाटल्यांतील ब्रोमाईन, मिथील ॲमाईन या पदार्थासह तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री असा २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थ तस्करी व उत्पादन केल्याप्रकरणी संशयित रहुदीप धानजी बोरिचा (वय ४१, रा. उत्तीयदरा कोसंबा, ता. भरूच, जि.सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (वय ३२ रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा वेस्ट मुंबई) आणि बलराज कातारी (वय २४ रा. विटा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बोरिचा हा बीएससी (रसायन) झाला असून तो आणि शेख माल तयार करत असल्याची माहिती मिळाली. तयार झालेला माल विक्रीसाठी कातारी हा घेऊन जात असे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा कारखाना एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला असून ३० हजार रुपये मासिक भाड्याने घेतला असल्याचे आणि तसा भाडेकरारही अद्याप करण्यात आलेला नाही, असेही अधीक्षक घुगे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Near karve industrial estate sangli police shut down mephedrone factory seizing stock worth rs 29 73 crore sud 02