महाराष्ट्रावर निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाचे मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी फिरताना आपल्याला जाणिवांच्या भावनांचा दुष्काळही मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वानीच प्रयत्नपूर्वक कामाला लागले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लातुरातील सीए सुनील कोचेटा यांना नगरच्या संस्थेने राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’ देऊन गौरविल्याबद्दल त्यांचा सत्कार समितीतर्फे पालकमंत्र्यांच्या हस्ते  करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. लाईफ केअर हॉस्पिटलच्या अर्चना पाटील चाकूरकर, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, सुनील कोचेटा सपत्नीक उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या की, आयुष्यात उणिवांच्या अडचणी येणे अतिशय आवश्यक आहे. जसजशा उणिवांच्या पायऱ्या चढायला आपण सुरुवात करू, तसतशी जाणीवजागृती निर्माण होण्यास सुरू होते. उणिवांच्या शेवटच्या पायरीवर पोहोचल्यावर जाणिवेची सर्वोच्च पातळी गाठता येते. समाजात अनेक प्रश्न आहेत, उणिवा आहेत; या दूर करण्यासाठी संवेदनशील मनाची गरज आहे. अशी मने तयार करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुनील कोचेटा यांनी आपली व्यवसायनिष्ठा सांभाळत, सर्वाशी सलोख्याचे संबंध ठेवत सामाजिक कामात दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सुधीर धुत्तेकर यांनी प्रास्ताविक केले. अर्चना पाटील व बी. बी. ठोंबरे यांची भाषणे झाली. सुनील होनराव यांनी आभार मानले. विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘मी रडणारी नाही’
वडिलांच्या निधनानंतर आपण रडत बसलो नाही. त्याची दोन कारणे सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आयुष्यभर रडतच बसावे असे ज्यांना वाटते, त्यांचा विजय होईल व माझ्या रडण्यामुळे ज्यांना दुख पोहोचेल ते पोहोचू नये, या साठी आपण जाहीर रडत बसत नाही. मी एकांतात असतानाच रडून घेते असा खुलासाही मुंडे यांनी केला.

Story img Loader