लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढलेला प्रभाव भारतीय कुटुंबसंस्थेला बाधक ठरत आहे. सुशिक्षित, श्रीमंत कुटुंबातील संस्काराच्या उणिवांमुळे किशोरवयीन मुलांना अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लागत आहे. हे संकट दूर करण्यासाठी परंपरेने आलेल्या श्रद्धा आणि संस्कारांना घेऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

डॉ. भागवत यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी समाजात वाढलेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली.

आणखी वाचा-राज्यातील सिंचन प्रकल्पांवरून अजित पवारांची जयंत पाटलांना कोपरखळी; म्हणाले, “आपल्या वेळी प्रकरण…”

ते म्हणाले, शतकानुशतके सातत्याने चालणाऱ्या मंगलकारी भारतीय परंपरेमध्ये मंदिरे ही श्रध्दा आणि संस्काराची शिदोरी ठरतात. ही शिदोरी प्रत्येक पिढीला सातत्याने मिळत आल्याने समाज उत्तमरीत्या जगत आला आहे. परंतु पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्यसनाधीन होणा-या तरूणपिढीला तारण्यासाठी मंदिरांविषयीची श्रध्दा आणि संस्कार हेच सर्वोत्तम तरूणोपाय ठरतात. प्रत्येक कुटुंबात संवाद घडवून आणत कुटुंब प्रबोधन करण्याची नितांत गरज असल्याचेही विचार त्यांनी मांडले.

सरसंघचालक डॉ. भागवत यांनी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात पूजा करून श्री सिद्धेश्वर महाराजांची आरती केली. तेथील नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदवत ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच’ अशा शुभेच्छा दिल्या. श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सरसंघचालकांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक सुनील इंगळे हे उपस्थित होते.

आणखी वाचा-एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, “औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने फादर..”

डॉ. भागवत यांनी गेल्या २४ जून रोजी अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामु समर्थ महाराजांच्या मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर ते शेजारच्या कर्नाटकातील निंबाळ (जि. विजयपूर) येथे श्रीगुरूदेव रानडे आश्रमात उपासनेसाठी थांबले होते. तेथून ते पुन्हा सोलापुरात आले होते. गुजराती मित्र मंडळाच्या सभागृहात डॉ. भागवत यांनी निवडक ६० दाम्पत्यांशी संवाद साधून मुलांवर उत्तम संस्कारासाठी विचार मांडले.