सततच्या निवडणुका देशाला परवडणाऱ्या नाहीत. त्याकरिता केंद्रामध्ये स्थिर शासनाची आवश्यकता आहे. असे शासन केवळ संयुक्त पुरोगामी आघाडी देऊ शकत असल्याने या आघाडीलाच जनता पुन्हा सत्तेमध्ये आणेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत  व्यक्त केला.    
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ खासदार सुळे जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराची माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यामुळे आत्तापर्यंत पहिल्यांदाच दोन्ही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते एकत्रितपणे आणि एकदिलाने उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. संपूर्ण राज्यात असेच चित्र असल्याने लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे.
राज्यातील सर्वाधिक जागा आघाडीलाच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे विदेशी तंत्राआधारे प्रचार करीत आहेत. तो येथील सामान्य जनतेला समजणारा नाही. शिवाय आजचा मतदार सुज्ञ असून त्याला राजकारण्यांचा खरेखोटेपणा समजलेला आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत केंद्रातील आघाडी शासनाने अनेक विकासाभिमुख कामे केलेली असून त्याआधारेच आम्ही जनतेसमोर मते मागण्यासाठी जाणार आहोत. कोणत्याही विरोधकांस कमी न लेखता त्यांना आघाडीने गांभीर्याने घ्यायचे ठरविले असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितले.    
शरद पवार यांनी अलीकडच्या काळामध्ये शाई, ठाकरे बंधू अशा काही विषयांवर वादग्रस्त शेरेबाजी केली आहे याकडे लक्ष वेधले असता पवारांच्या कन्या सुळे यांनी या विधानांचा लोकसभा निवडणुकीच्या यशावर कसलाही परिणाम होणार नाही, असा खुलासा केला. ठाकरे व पवार या दोन्ही कुटुंबांतील घरगुती संबंध अतिशय चांगले आहेत, पण त्यावर अधिक काही बोलणार नाही असे नमूद करतानाच सुळे यांनी उद्धव व राज बंधूंनीच ठाकरे घराण्यातील वाद मिटवावा असा सल्ला दिला. यशस्विनी या आपण चालवत असलेल्या महिला संघटनेचा वापर निवडणुकीसाठी बिलकूल करणार नाही. यशस्विनी व राजकारण्यांचा परस्पर संबंध नाही. यशस्विनीचे कार्य हे राजकारणविरहित असल्याचे त्यांनी सांगितले.    
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस कार्यालयात महिला मेळावा पार पडला. कोल्हापूरच्या रणरागिणींनी कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता महाडिक यांच्या प्रचाराला जोमाने लागण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर सुनीता राऊत आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा