देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. प्रचार फेऱ्या, आश्वासनं, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरा झडत आहेत. इंडिया आघाडी विरूद्ध एनडीए अशी लढत असून विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसाठी रंगीत तालिम असल्याचंही म्हटलं जातंय. असं असतानाच इंडिया आघाडीचे ज्यांनी बीज रोवले ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जम्मू काश्मीरचे ओमर अब्दुल्ला यांच्या काही वक्तव्यांनी देशभर खळबळ माजली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत आलबेल आहे ना? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चांवर आणि इंडिया आघाडीच्या वक्तव्यांवर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
इंडिया आघाडीवर आता मंथन करणे गरजेचे
“इंडिया आघाडीत सर्व आलबेल आहे का? यावर सध्या अनेकांचे चिंतन व मंथन सुरू आहे. ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाल्यापासून भाजपची झोप उडाली व त्यांनी त्यांच्या ‘एनडीए’वरची धूळ झटकली. ‘इंडिया’चा धसका असा की, मोदी व त्यांच्या लोकांनी ‘इंडिया’ नामावर अघोषित बंदीच आणली. याचा अर्थ सत्ताधारी पक्षात ‘इंडिया’वर चिंतन व मंथन सुरू आहे. हे ‘इंडिया’चे प्राथमिक यश आहे, पण इंडिया आघाडीतील काही सहकाऱ्यांनाच चिंता वाटू लागल्याने त्यावर मंथन करणे गरजेचे आहे”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
आरोप खरे, पण चिंताजनक नाही
“जम्मू-कश्मीरचे ओमर अब्दुल्ला व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘इंडिया’वर भाष्य केले. श्रीमान अब्दुल्ला यांनी सांगितले की, इंडिया आघाडीची स्थिती सध्या मजबूत नाही. थोडी अंतर्गत भांडणे आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तरी अशा प्रकारे मतभेद असू नयेत. उत्तर प्रदेश विधानसभेतील सर्व जागा लढवू असे समाजवादी पार्टी व काँग्रेसने जाहीर केले. हे इंडिया आघाडीसाठी चांगले नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने ‘सपा’ला जमेस धरले नाही, ‘आप’ही स्वतंत्रपणे मैदानात आहे. हे सर्व खरेच आहे, पण चिंताजनक नाही. ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली ती दिल्लीतील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी व त्यावर सगळ्यांचेच एकमत आहे. राज्याराज्यांतील स्थिती व राजकारण वेगळे असून व त्याबरहुकूम त्या राज्यातील प्रमुख पक्षांना निर्णय घ्यावे लागतात”, असंही ते म्हणाले.
पाच राज्यांतील निवडणुका ही आगामी लोकसभेची रंगीत तालीम
“पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत लढणारा काँग्रेस हाच प्रमुख पक्ष आहे व बाकी पक्ष तेथे दुय्यम आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये काँगेसबरोबरच भाजपशी लढा आहे व तेलंगणात आघाडी घेईल असे दिसत आहे. तेथे सत्तांतर होईल असे चित्र आहे. मायावती यांनी मध्य प्रदेशात त्यांचा हत्ती घुसवला तो काँग्रेसला कमजोर करण्यासाठी. बाकी काही किरकोळ घटना वगळता पाच राज्यांत ‘इंडिया’ आघाडीने चिंता करावी असे काही दिसत नाही. पाच राज्यांतील निवडणुका ही आगामी लोकसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने, राहुल-प्रियांका गांधी यांनी झोकून दिले असेल तर ते योग्यच आहे. उलट भाजपच्या पराभवासाठी या राज्यांत ‘इंडिया’तील प्रत्येक घटकाने हातभार लावायलाच हवा”, असा सल्लाही या माध्यमातून देण्यात आला.
जाहीर मतप्रदर्शन करून भाजपास गुदगुल्या करू नयेत
“लोकशाही वाचवण्यासाठी ही सगळ्यांना शेवटची संधी आहे, पण नितीश कुमार यांची चिंता जरा वेगळी आहे. कुमारांचे म्हणणे आहे की, काँग्रेसला ‘इंडिया’पेक्षा निवडणुकीतच रस आहे. कुमारांचे म्हणणे चुकीचे नाही, पण त्यांनी वास्तव नाकारू नये. ‘इंडिया’ आघाडीतील प्रत्येक पक्षाला निवडणुकीतच रस असायला हवा. आपण राजकारणात आहोत व दिल्लीच्या सत्तेचा पाया भक्कम करायचा असेल तर विधानसभा निवडणुका जिंकून पाचही राज्यांचा ताबा घ्यावा लागेल. कुमारांची खंत अशी की, ” ‘इंडिया’ आघाडीच्या हालचाली थांबल्या असून त्यास काँग्रेस जबाबदार आहे. पाच राज्यांतील निवडणुका जिंकण्यात त्यांना रस आहे. विरोधी आघाडी पुढे नेण्याची त्यांना चिंता नाही. सध्या फारसे काही होत नाही.” कुमारांची चिंता व खंत चुकीची नाही व त्यावर ‘इंडिया’ने एकत्र येऊन बोलावे. जाहीर मतप्रदर्शन करून भाजपास गुदगुल्या करू नयेत”, असा सज्जड दमही ठाकरे गटाने भरला आहे.
‘इंडिया’ सर्वसमावेशक
“काँग्रेस हा इंडिया आघाडीतील मोठा पक्ष आहे, पण ‘इंडिया’ आघाडीमध्ये अनेक आले आहेत. त्यात शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्षही सामील आहे. त्यामुळे ‘इंडिया’ सर्वसमावेशक आहे. राज्यांचे जागावाटप, इतर मतभेद सोडविण्यासाठी खालच्या स्तरावर समन्वय समित्या नेमाव्यात असे ठरले व राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र समिती काम करील. प्रत्येकाला निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर ‘इंडिया’चे एकत्र येणे हे त्या त्या राज्यांच्या परिस्थितीवर व पक्षांच्या वकुबावर अवलंबून आहे, पण राष्ट्रीय स्तरावर सध्याच्या भ्रष्ट, मनमानी, हुकूमशाही राजवटीचा पराभव करण्यासाठी ‘इंडिया’ मजबुतीने उभी आहे”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
नितीश कुमारांच्या चिंतेचाही सन्मान व्हावा
“नितीश कुमार म्हणतात, काँग्रेसला निवडणुकीत रस जास्त आहे. असा रस आपल्या देशात कोणाला नाही? आपली लोकशाही निवडणूकग्रस्त आहे. त्यामुळे आपले पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री देशाचे प्रश्न मणिपूरच्या आगीत टाकून सदान्कदा निवडणूक प्रचारातच गुंतलेले दिसतात. ‘इंडिया’तील घटक पक्षांनी पुढचा काही काळ हेच धोरण स्वीकारायला हवे. निवडणुका लढवायच्या नसतील व जिद्दीने जिंकायच्या नसतील तर एकत्र येण्याचा मतलब काय? मोदी-शहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करीत आहे. ईडी धाडी घालून भाजप विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना अटका करीत आहे व या कारवाया एकतर्फी आहेत. सत्तेचा गैरवापर व पैशांचा माज थांबवून देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करावी लागेल व त्यासाठी आधी पाच राज्यांतील निवडणुका काँग्रेसला जिंकाव्या लागतील. ‘इंडिया’ आघाडीच्या मजबुतीसाठी ते महत्त्वाचे ठरेल. नितीश कुमारांच्या चिंतेचाही सन्मान व्हावा. ‘इंडिया’ आघाडीचे बीज त्यांनीच रोवले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-कश्मीर-लडाखच्या सर्व जागा जिंकण्याचा विडा उचलावा. २०२४ चा विजय ‘इंडिया’चाच आहे!”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.