सध्याच्या राजकीय वातावरणात राजकीय पक्ष आणि जनता यांचे संबंध कसे राहणार हे शोधणे आवश्यक ठरणार आहे, असे मत ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. कुमार शिराळकर यांनी व्यक्त केले. येथील कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘दीपस्तंभ’ पुरस्कारांचे बुधवारी सायंकाळी वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिराळकर यांनी प्रसारमाध्यमांच्या कार्यशैलीवर बोट ठेवत केवळ उच्चभ्रू वर्गासाठी धडपडणारी माध्यमे तळागाळातील घटकांपर्यंत पोचत नसल्याची खंत व्यक्त केली.
सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड उपस्थित होते. दीपस्तंभ पुरस्काराने जव्हारचे रतन बूधर, कागलचे दत्तात्रय माने आणि तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित विद्यालय यांना सन्मानित करण्यात आले. विद्यालयाचा पुरस्कार प्राचार्य दिनकर कोल्हे यांनी स्वीकारला. ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिराळकर यांनी आपल्या भाषणात प्रारंभी नाना मालुसरे यांच्या कार्याचा ‘अनासक्त कर्मयोगी’ असा गौरव केला. नानांनी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आणि चळवळीला बळ दिले. दुर्गम आदिवासी भागात त्यांनी काम केले. जहाल व मूलभूत परिवर्तन करणारी ऊर्जा त्यांच्यात होती. मार्क्‍सवाद त्यांनी चळवळीतून जपला असे शिराळकर यांनी नमूद केले. सामाजिक चळवळीत काम करताना कुटुंबातील इतर सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात चळवळीचे स्वरुप पूर्णपणे बदलल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ आणि आताच्या चळवळी यात बराच फरक आहे. सहज मिळणारा पैसा हा कार्यकर्त्यांना नायनाट करणारा ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. प्रसारमाध्यमेही आता ‘कॉर्पोरेट कल्चर’च्या उध्दारासाठी प्रयत्नरत आहे. तळागाळातील घटकापर्यंत ती जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कॉ. रतन बूधर व कॉ. दत्तात्रय हरी माने या पुरस्कार्थीनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य कोल्हे यांनी संस्थेच्या उभारणीतील योगदानाची माहिती दिली.
सोहळ्यात आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी तर प्रास्ताविक संस्थेच्या विश्वस्त अनुराधा मालुसरे यांनी केले.

Story img Loader