अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलावर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, याच निवडणुकीच्या आणि मिळालेल्या नव्या चिन्हाच्या पार्श्वभूवीर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच विधान केले आहे. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. हीच नियतीची इच्छा असावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजी? स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे. प्रत्येकाचे वय वाढत असते. माणूस वयाने मोठा होत असतो. पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो खरा वृद्ध होतो. अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले. महाविकास आघाडीच्या रुपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>>“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!
पुढे बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांचीही स्तुती केली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. आपला माणूस सोडून जाऊ शकतो हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. राग वगैरे नंतरची गोष्ट आहे. मात्र बाळासाहेब असतानाच तुम्ही हे सगळं मिटवून टाकलंत हे चांगलं केलं. तुम्ही घरी आले, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. तुम्ही मतभेद मिटवून टाकले होते. जाऊदेत या गोष्टी ठरवून होत नसतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.