रायगड किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी शिवशौर्य ट्रेकर्स या संस्थेने केली आहे.
रायगड किल्ला हा तमाम शिवप्रेमीसाठी मानिबदू आहे. मात्र इथे येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांकडून किल्ल्याचे पावित्र्य राखले जात नाही. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केली जाते, समाधीस्थळ परिसरात खाद्यपान केले जाते. पाण्याच्या बाटल्या इतरत्र टाकल्या जातात. किल्ल्याच्या िभतीवर नावे कोरली जातात. मोबाइलवर नाचगाणी वाजवली जातात. यामुळे अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी तातडीने पावले उचलली जावीत, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अमित मेंगळे साईकर यांनी केली आहे.
गडावर राजदरबार आणि समाधी परिसरात चौकीदारांची नेमणूक करण्यात यावी. पर्यटकांना सूचना देणारे फलक बसवण्यात यावेत, प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांवर र्निबध आणले जावे, गडाच्या साफसफाईसाठी कामगारांची नियुक्ती करण्यात यावी. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.