श्रद्धेमुळे मूलभूत विचार करण्याची शक्ती मारली जाते. त्यातून माणूस अधिकाधिक दैववादी व कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे समाजहितासाठी केवळ अंधश्रद्धांपासूनच नव्हे, तर श्रद्धांपासूनही सावध राहणे आपल्या हिताचे आहे. भारताला जगात आघाडीवर रहायचे असेल, तर आपण श्रद्धाळू भाविक, भोळेभाबडे न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून जुनाट श्रद्धा व आपले सनातनत्व साफ नाकारले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. शरद बेडेकर यांनी व्यक्त केले.
‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सनातन संस्थेचे माजी प्रवक्ते अभय वर्तक यांनी परिसंवादात सहभाग घेतला. बेडेकर म्हणाले की, ईश्वरी कर्तृत्वाच्या श्रद्धा बाळगून आपण कितीही सुशिक्षित असलो, तरी भोळेभाबडे बनू शकतो. आमच्या श्रद्धांमुळे आमचा पराभव होऊ शकतो, आमच्या कत्तली होऊ शकतात, मग हव्यात कशाला त्या श्रद्धा! आधुनिक जगात कुणाही व्यक्तीचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित श्रद्धेने नव्हे, तर केवळ बुद्धीने, विज्ञानाने व चिकित्सेने साधले जाईल. श्रद्धांतून मिळणारा मानसिक आधार आभासात्मक व खोटा आहे. आधुनिक काळातील माणसांसाठी श्रद्धा घातक आहेत, त्यामुळे समाज व स्वत:च्या हितासाठी अंधश्रद्धांबरोबर श्रद्धाही नाकाराव्यात.
देव, धर्म, श्रद्धा, गुरू आणि सनातनत्व यांचे प्राबल्य वाढविण्यासाठी एका चौकडीचे कारस्थान सतत कार्यरत आहे. राजकारणी, धर्मकारणी, धंदाकारणी व सर्व प्रकारातील गुन्हेगार हे या चौकडीचे चार कोन आहेत. आज राज्यात व देशातही नवनवे देव व देवळे प्रसिद्धी पावत आहेत. धार्मिक जल्लोष, जत्रा व धुडगूस वाढत आहे. नवनव्या गुरूंचे प्रताप समोर येत असतानाही त्यांचे प्रस्थ व प्रभाव वाढतच आहे. राजकर्तेही मतांसाठी त्यांची बाजू घेतात. दुसरीकडे या मंडळींचा प्रभाव वाढू नये व पुरोगामी मते स्वीकारली जावीत, असा प्रयत्न करणाऱ्या संघटना किंवा चळवळी अभावाने दिसून येत आहेत.
अविनाश पाटील म्हणाले की, चिकित्सेला नकार व स्फोटक बनलेला भ्रम म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्ध म्हणजे विश्वास ठेवणे, पण श्रद्धा प्रश्नांकित करणे, तपासणे म्हणजे धर्म प्रश्नांकित करणे, असा बागुलबुवा केला जातो. त्यामुळे श्रद्धा तपासण्याचा वारसा आपण नाकारतो व त्यातून अडचण निर्माण होते.
धर्मश्रद्धा म्हणजेच श्रद्धा, असे मत असल्याने त्याची चिकित्सा केली की धर्माला विरोध समजला जातो. ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य, शब्दप्रामाण्य हे चिकित्येतील अडथळे आहेत. मृत्यूपासून स्वत:ला दूर ठेवण्याची धडपड, ताण-तणावातून व्यक्ती अगतिक होतात, अशा वेळी वैज्ञानिक दृष्टी नसल्यास माणूस अंधश्रद्धेकडे वळतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून श्रद्धाही तपासल्या पाहिजेत.
अभय वर्तक म्हणाले की, श्रद्धा ही कधी अंध नसते. श्रद्धा एक भावना आहे, ती अंध असेल, तर आईचे मुलावरील प्रेम किंवा देशावरील प्रेमही अंध म्हणावे लागेल. श्रद्धा दिसत नाही म्हणून ती मानणार नाही, हे चुकीचे आहे. परमेश्वर नाही, श्रद्धा नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. धर्माच्या क्षेत्रातील दांभिकता व भोंदुगिरीच्या प्रथा बंद व्हाव्यात, असे आमचेही ठाम मत आहे.
अंधश्रद्धाच नव्हे, तर श्रद्धासुद्धा नाकारावी – शरद बेडेकर
श्रद्धेमुळे मूलभूत विचार करण्याची शक्ती मारली जाते. त्यातून माणूस अधिकाधिक दैववादी व कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे समाजहितासाठी केवळ अंधश्रद्धांपासूनच नव्हे, तर श्रद्धांपासूनही सावध राहणे आपल्या हिताचे आहे. भारताला जगात आघाडीवर रहायचे असेल, तर आपण श्रद्धाळू भाविक, भोळेभाबडे न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-09-2014 at 03:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to remain cautious not only from superstition but also from conviction says sharad bedekar