एकनाथ शिंदे गटानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गट युतीत सामील झाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवरून पेच निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. या जागांसाठी तिन्ही पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.
युतीत सामील झाल्यानंतर आता आपल्याला ताकद दाखवावी लागेल, तरच हक्काने जागा मागता येतील, असं सूचक वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं. ते मुंबईत अजित पवार गटाच्या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नेते आणि मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.
हेही वाचा- “…तेव्हापासून पंकजा मुंडेंचं खच्चीकरण सुरू झालं”, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं मोठं विधान
यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत, म्हणजेच महाराष्ट्राच्या १५ टक्के जागा केवळ मुंबईत आहेत. हे आपण विसरून चालणार नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मिळून विधानसभेच्या ६० जागा आहेत. एवढ्या मोठ्या भागात आपण राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट केलं नाही तर आपण महाराष्ट्रात मजबूत आहोत, असं कसं सांगता येईल.”
हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
“आज आपण युतीमध्ये गेल्यानंतर आपली ताकद दाखवल्याशिवाय कुणी आपल्याला न्याय देईल, अशी अपेक्षा कसं काय बाळगू शकतो. त्यामुळे आपल्या सर्वांना तिथे आपली ताकद उभारावी लागेल. त्याशिवाय हक्काने कुठलीही जागा मागता येणार नाही,” असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं.