आगामी निवडणुकीत उद्धव व राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत असे मत व्यक्त करतानाच तसे झाले तर महाराष्ट्रात महायुती दोनतृतीयांश बहुमत मिळवेल, असा विश्वास भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मात्र राज ठाकरे हा प्रस्ताव स्वीकारतील असे आपल्याला वाटत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली.
न्यायालयाची तारीख व पक्षाचा मेळावा यासाठी आठवले आज येथे आले होते. मेळाव्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले नाही तरी कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ता मिळवायचीच असा चंग आम्ही बांधला आहे. ही मनोकामना आम्ही पूर्ण करणार. भारिपने महायुतीत लोकसभेच्या सात जागा मागितल्या असून त्यात शिर्डीचा समावेश नाही. शिर्डीची जागा शिवसेनेला सोडून देण्यात आली आहे. नगरच्या महानगरपालिका निवडणुकीतही आम्ही जागा मागणार आहोत असे आठवले म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुरती ढासळली असून, त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप आठवले यांनी केला. ते म्हणाले, मुंबईतील महिला पत्रकारावर झालेला बलात्कार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हे त्याचेच द्योतक आहे. या आरोपींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. मात्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यात राज्य सरकारला अद्यापि यश आले नाही, ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका आहे. डॉ. दाभोलकर हिंदूंच्या विरोधात नव्हते, ते बुवाबाजीच्या विरोधात होते. वेळीच त्यांना संरक्षण दिले असते तर ही वेळ आली नसती असे सांगतानाच या अर्थाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप आठवले यांनी केला. तसेच हत्येने डॉ. दाभोलकरांचा विचार संपणार नाही असे ते म्हणाले.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही दोनदा पराभव केला होता याची आठवण करून देत आपण बाबासाहेबांचाच विचार घेऊन पुढे चाललो आहोत असे आठवले यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेसच्या या राजकीय धरसोडीचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. अन्नसुरक्षा कायद्याचाही काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही. या विधेयकाला आम्ही पाठिंबा दिला आहे असे ते म्हणाले.   

Story img Loader