सध्या राजकारणात केवळ बोलायला येऊन उपयोग नाही, तर मनगटाचा वापर करणे आवश्यक आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी सांगितले. मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात श्रीमती सुशीलाताई साळुंखे भवनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजमन शैक्षणिक कामात उदास बनले आहे अशा स्थितीत मान्यवर संस्थांनी पुढाकार घेऊन दिशादर्शक काम करण्याची गरज आहे. बुद्धी व ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही. हे लक्षात घेऊन समाजातील बौद्धिकता वाढविण्यासाठी कोणती आव्हाने आहेत याचा विचार चर्चासत्रातून संशोधकांनी मांडावा.
राजकारण हे क्षेत्र दुर्लक्षित करण्यासारखे मुळीच नाही. या क्षेत्रातही चांगले लोक यायला हवेत. मात्र त्यांचा चांगुलपणा टिकणे गरजेचे आहे. चांगल्या माणसांना राजकारणात बिघडवले जाण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. राजकारणात आले की, केवळ बोलघेवडेपणा उपयोगाचा नाही. काही प्रसंगी मनगटाचा म्हणजेच बलाचा वापर करणे आवश्यक ठरतो की काय, अशी स्थिती सध्या राजकारणात निर्माण होऊ लागली आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने साखर उद्योगासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा